बंडू येवले | लोणावळा :

तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक चारमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून विविध मागण्यांबाबत आज तळेगावजवळील आंबी येथे एमआयडीसी रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या दरम्यान विद्यमान आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक चार नियम कायमस्वरुपी रद्द करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर टाकलेले ३२ (२) हे शिक्के काढा, गेल्या तीन वर्षांमध्ये झालेले शेतीचे गैरव्यवहार रद्द करा, या मागण्यांसाठी तळेगाव एमआयडीसीमधील आंबी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनातच राजकीय कलगीतुरा रंगला.

नेमकं काय घडलं?
शेतकरी आंदोलनावेळी आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या भाषणात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या असा आरोप केला होता.

त्यानंतर बाळा भेगडे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन त्यांना पैसे द्यावेत, अशी आमची मागणी असल्याचं म्हटलं. भेगडे यांनी असं वक्तव्य केल्यानंतर आमदार सुनिल शेळके यांनी माझ्यावर व्यक्तीगत आरोप करू नका, असं सांगितलं. यावर भेगडे म्हणाले की, तुम्ही ऐकण्याची भूमिका घ्या. बाळा भेगडे यांच्या वक्तव्यानंतर आमदार सुनिल शेळके हे सभेतून उठून उभे राहिले आणि म्हणाले की, माझ्यावर व्यक्तीगत आरोप करू नका, असे होते तर आम्हाला का बोलावलं, आमची बदनामी करायला बोलावले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या सर्व घटनाक्रमामुळे आजी माजी आमदार भर आंदोलनातच एकमेकांवर भडकल्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन बाजूला राहिले आणि राजकीय वातावरणच तापल्याचे पाहायला मिळाले. यामुळे नाराज झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. काही वेळाने आजी-माजी आमदारांनी माघार घेतली आणि तेथून निघून गेले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here