कोल्हापूर : राज्यातील १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीचं (District Central Co-operative Banks Election) बिगुल वाजलं असतानाच दक्षिण महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रवादीचाच गजर होण्याची दाट शक्यता आहे. सध्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही बँकांवर याच पक्षाची सत्ता असून सध्याची राजकीय समीकरणे पाहता बहुसंख्य संचालक पुन्हा बिनविरोधच कारभारी होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांशी कारभारी हे मंत्री, खासदार आणि आमदार हेच असणार आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने दिले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने सुरू होणार असल्याने सहकारातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. यातील दक्षिण महाराष्ट्रातील ज्या तीन जिल्हा बँका आहेत, त्यावर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. शिवाय महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आल्याने या बँकांतही महाविकास आघाडी होणार हे जवळजवळ स्पष्ट आहे. सहकारात भाजपची ताकद कमी असल्याने या बँकेत महाविकास आघाडी विरोधात थेट लढण्याची चिन्हे नाहीत. पक्षाच्या काही नेत्यांना संचालक म्हणून संधी मिळत असेल तर भाजप या निवडणुकीपासून चार हात लांब राहण्याचीच दाट शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेवर गेली सहा वर्षे महाविकास आघाडीची सत्ता असली तरी वर्चस्व मात्र राष्ट्रवादीचे आहे. सहा वर्षे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्ष आहेत. भाजपचे केवळ एक दोन संचालक असल्याने हा पक्ष ताकदीने या निवडणुकीत उतरण्याची चिन्ह दिसत नाहीत. यामुळे काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला सोबत घेत निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली मंत्री मुश्रीफ यांनी सुरू केल्या आहेत. मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची जिल्ह्यात गट्टी असल्याने आणि गोकुळ व जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आमदार विनय कोरे व आमदार पी.एन. पाटील यांच्याशी जवळीकता वाढल्याने त्याचा उपयोग जिल्हा बँकेत होण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्हा बँकेत ‘जयंत पॅटर्न’ कार्यरत आहे. येथे राष्ट्रवादीचे दिलीप पाटील अध्यक्ष तर भाजपचे संग्राम देशमुख उपाध्यक्ष आहेत. वसंतदादा आणि पतंगराव कदम गटाला बाजूला ठेवण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून आघाडी केली होती. त्याला यश आले. पाच वर्षात वातावरण बदलल्याने आणि विरोधही मावळल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात मंत्री पाटील यांना फार कष्ट घ्यावे लागतील असे वाटत नाही. मंत्री विश्वजीत कदम आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांना सोबत घेऊन ते ही निवडणूक बिनविरोध करण्याचीच दाट शक्यता आहे.

सातारा जिल्हा बँकेवर अनेक वर्षे राष्ट्रवादीचाच झेंडा आहे. सध्या तर अध्यक्ष भाजपचा आणि सत्ता राष्ट्रवादीची अशी या बँकेची अवस्था आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष असले तरी सत्ताकेंद्र मात्र राष्ट्रवादीच्या रामराजे निंबाळकर यांच्या हातात आहे. येथेही भाजपची थेट विरोधात लढण्याएवढी ताकद नाही. यामुळे बहुसंख्य जागा बिनविरोधच होण्याची चिन्हे आहेत. रामराजे निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्या वादात काही ठिकाणी वातावरण तापेल असे वाटते. पण, दोन प्रबळ गट एकमेकांविरोधात लढण्याची चिन्हे नाहीत.

खासदार, आमदारच पुन्हा कारभारी
दक्षिण महाराष्ट्रातील खासदार, आमदार आणि मंत्री हेच जिल्हा बँकेचे कारभारी आहेत. नव्या समीकरणातही पुन्हा तेच कारभारी होणार यात शंका नाही. यामुळे खासदार प्रा. संजय मंडलिक, संजय पाटील, उदयनराजे भोसले या खासदारांबरोबरच हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर अशा अनेक मंत्र्यांनी संचालक होण्यासाठी फिल्डींग लावली आहे. याशिवाय मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, पी.एन. पाटील, राजेश पाटील, विनय कोरे, रामराजे निंबाळकर, जयकुमार गोरे, अनिल बाबर,विक्रम सावंत असे अनेक आमदार पुन्हा जिल्हा बँकेचे कारभारी म्हणून दावेदार असतील.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here