रत्नागिरी जिल्ह्यात दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार संजय कदम यांच्याविरोधात रामदास कदम यांचे चिरंजीव आणि विद्यमान आमदार योगेश कदम हे उभे होते. त्यावेळी माझी मानहानी होईल आणि माझ्या प्रतिष्ठेला डाग लागेल असे कृत्य संजय कदम यांनी केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला.
‘शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या डेन्टल कॉलेजच्या जमिनीबाबत संजय कदम निराधार वक्तव्य केलं. त्यानंतर मी मुंबई उच्च न्यायालयात संजय कदम यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यावेळी आमदार संजय कदम यांनी न्यायालयात माझी बिनशर्त माफी मागितली होती आणि पुन्हा असे कृत्य करणार नाही, असे न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते,’ असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
‘माझा मुलगा निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा माझ्याविरोधात तसंच शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या विरोधात काहीही सबंध नसताना खोटे आरोप करत न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा भंग करत न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात मी संजय कदम यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे,’ अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times