ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून लशीच्या तीन बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यातील एक बाटली रिकामी आहे. या दोन्ही आरोपींना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.एम. पोतदार यांनी मंगळवारी (१० ऑगस्ट) दिले.
या प्रकरणात गंगापूर तालुक्याचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. विवेक वसंतराव कांबळे (४४) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, ९ ऑगस्ट रोजी एमआयडीसी वाळुज पोलिसांनी माहिती मिळाली की, रांजणगाव शें.पुं. येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवक गणेश दुरोळे हा नागरिकांकडून पैसे घेऊन साजापूर चौकात करोनावरील लस देत आहे. या माहितीवरुन पोलिसांनी छापा टाकून गणेश दुरोळे याच्या मुसक्या आवळल्या.
आरोपीकडून लशीच्या तीन वॉयल, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा सुमारे ३ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. दुरोळे याची चौकशी केली असता, सदरील लस सुपरवायझर तथा आरोग्य सेवक सय्यद अमजत याच्याकडून घेतल्याचे सांगितले. या प्रकरणात एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहाय्यक सरकारी वकील सय्यद शहनाज यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ‘आरोपींनी सदरील वॉयल कोणत्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून घेतली याचा तपास करुन त्यांना अटक करणे गरजेचे आहे, आरोपीने किती नागरिकांना पैसे घेऊन लस दिली व त्यातील किती नागरिकांनी मोफत लस दिल्याची कोव्हीन अॅपवर नोंदणी केली? आरोपीने कोणत्या शिक्षकामार्फत नोंदणी केली? त्याचा गुन्ह्यात सहभाग आहे का? नागरिकांना लस देण्यासाठी आरोपींकडे कोण पाठवत होते? याचा तपास बाकी आहे. तसेच आरोपींनी यापूर्वी देखील असा गुन्हा केल्याची दाट शक्यता असल्याने आरोपींना पोलीस कोठडी द्यावी,’ अशी विनंती न्यायालयाकडे केली. त्यानंतर सदरील आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times