मुंबई: राज्याचा गाडा जिथून हाकला जातो, त्या मंत्रालयातच मंगळवारी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच सापडल्यानं खळबळ उडाली आहे. मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा, याच्या चौकशीचे आदेश सामान्य प्रशासन विभागानं दिले आहेत. विरोधी पक्षानंही चौकशीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा:

‘मंत्रालयात बाटल्या सापडल्याचं आम्ही ऐकलंय. नेमकं काय आम्हाला माहीत नाही. बाटल्यांचा वास घ्यायला कोण गेलं हे माहीत नाही. पण मंत्रालयाला कुणी उगाचच बदनाम करू नये. या बाटल्या आताच्या नाहीत, बाटल्याचा हा खच साधारण दीड वर्षांपूर्वीचा आहे, असं एका अधिकाऱ्यानं सांगितल्याचं संजय राऊत म्हणाले. ‘त्यावेळेला आमचं सरकार नसावं. करोनानंतरच्या काळात मंत्रालयात कुणाचाही वावर नव्हता. जवळपास वर्षभर मंत्रालय बंद होतं. आता हळूहळू सुरू झालं आहे. माणसं जात आहेत. त्यामुळं या बाटल्या कधीच्या आहेत हे तपासण्यासाठी भाजपनं त्या लॅबमध्ये पाठवाव्यात. किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, असा टोला राऊत यांनी हाणला. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

नेमक्या कुठं सापडल्या बाटल्या?

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत उपहारगृहाच्या बाजूला तळमजल्याच्या आसपास अडगळीत दारूच्या बाटल्यांचा खच असल्याचं निदर्शनास आलं होतं. याची माहिती मिळताच त्या बाटल्या लगेचच हटवण्यात आल्या. मंत्रालयात अतिशय कडक सुरक्षाव्यवस्था, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. अशा वेळी मंत्रालयात दारू रिचवणारे तळीराम कोण याचा शोध घेतला जात आहे.

विरोधकांची टीका

‘दारुच्या बाटल्या सापडणं गंभीर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे. दारूच्या बाटल्या मंत्रालयात कशा गेल्या हा प्रश्न नाही. हा कल्चरचा विषय आहे. मंदिरं बंद ठेवून दारूची दुकाने सुरू केली तिथेच कल्चरची वाट लागली,’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here