म. टा. वृत्तसेवा, पंचवटीः मखमलाबादरोडवरील शिंदेनगर येथील सोसायटीतील सदनिका पेटविण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला. त्यात दोन महिला गंभीर भाजल्या असून, घरातील वृद्ध, दोन मुले बचावली. मात्र, फर्निचरसह इतर वस्तू खाक झाल्या.

एका रिक्षाचालकाने ही आग लावल्याचा संशय असून, ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचा तपास पोलिस करीत आहेत. पोलिस व पीडित कुटुंबाच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील भाविक बिलाजियो सोसायटीत प्रदीप ओमप्रकाश गौड (वय ३९), त्यांचे आई-वडील, पत्नी, भाऊ, भावजय, मुले व पुतणे असे एकूण दहा जण राहतात. मंगळवारी सकाळी त्यांच्या मावशी भारती गौड त्यांच्याकडे आलेल्या होत्या. घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर आई-वडील, मावशी व दोन लहान मुले घरात असताना ही घटना घडली.

दुपारी बाराच्या सुमारास या कुटुंबाच्या परिचयाचा रिक्षाचालक कुमावत (पूर्ण नाव माहीत नाही) हा हातात दोन पेट्रोलच्या बाटल्या घेऊन त्यांच्या घरी आला. त्याने घरातील भारती गौड यांना मारहाण केली, बाटल्यांतील पेट्रोल हॉलमध्ये टाकून आग लावून तो फरार झाला. यावेळी प्रदीप यांची आई सुशीला गौड (६५), मावशी भारती गौड (५५), आजोबा जानकीदास गौड (८५), पार्थ (१५) आणि चिराग गौड (३ वर्षे) हे घरात होते. पार्थ बेडरूममध्ये अभ्यास करीत असताना हॉलमधील भांडणामुळे बाहेर आला असता आग लागलेली बघून त्याने बेडरूमचा दरवाजा बंद करीत आई-वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली.

स्थानिक धावले, पण…

आग लागल्याचे बघून इतर रहिवाशांनी अग्निशामक दल व पोलिसांना कळविले. इतर सदनिकांतून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीत सुशीला गौड व भारती गौड या दोघी बहिणी गंभीर भाजल्या, तर हॉलमधील फर्निचरसह टीव्ही, मुख्य दरवाजा व इतर वस्तूही खाक झाल्या. भिंत व छतावरील प्लास्टरचे पोपडे निघाले. गॅलरीच्या काचा तडकून फुटल्या. फ्रिज व कपाटालाही आगीची झळ बसली. सदनिकेच्या बाहेरही आगीने छत काळे पडून पोपडे निघाले.

संशयितही भाजल्याची चर्चा

दोन्ही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, संशयित कुमावत याला काही नागरिकांनी पळून जाताना बघितले. तोही भाजला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, निरीक्षक (गुन्हे) अशोक साखरे, उपनिरीक्षक अश्विनी उबाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here