वाचा:
सरकारनं मंजूर केलेल्या दोन शिक्षण संस्थांशी संबंधित शाळांमध्ये २० अनुदानानुसार नियमत वेतन सुरू करण्याचा कार्यादेश काढण्यासाठी वैशाली झनकर यांनी ९ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती आठ लाख रुपये देण्याचं ठरलं होतं. दरम्यान तक्रारदारानं ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (ACB) संपर्क साधला. तक्रारीचा शहानिशा केल्यानंतर एसीबीचं पथक थेट नाशिकला रवाना झालं. नाशिकमधील एसीबी पथकाच्या मदतीनं मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर सापळा रचला. लाचे म्हणून ठरलेली रक्कम स्वीकारण्यासाठी एक व्यक्ती पुढं येताच ‘एसीबी’च्या पथकानं तिघा संशयितांना ताब्यात घेतलं. एक पथक रात्री उशिरापर्यंत जिल्हा परिषदेत तळ ठोकून होते. डॉ. झनकर या वर्ग-१ च्या अधिकारी असल्याने, त्यांच्या घरासह मालमत्तेची झडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
चौकशीनंतर शिक्षणधिकारी झनकर घरी परतल्या होत्या. सकाळी साडेआठ वाजता न्यायालयात हजर होण्याचे आदेश एसीबीनं त्यांना दिले होते. मात्र, हे आदेश धुडकावून वैशाली झनकर-वीर गैरहजर राहिल्या आहेत. त्या फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील अन्य दोन संशयित शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते या दोघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. या दोघांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times