अहमदनगर जिल्ह्यात दिवसभारत २० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१८ टक्के आहे. दोन-तीन दिवस दैनंदिन रुग्णसंख्येत घट नोंदविली गेल्यानंतर बुधवारी ती पुन्हा वाढली आहे. त्यामुळे सरकारतर्फे नियम शिथील करण्याची तयारी सुरू असली तरी जिल्ह्यातील करोना निर्बंध कायम ठेवले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
देशात आणि राज्यातही अनेक ठिकाणी करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आता निर्बंध शिथील करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातही अनेक शहरांत आणि जिल्ह्यात अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. व्यावसायांसोबतच आता शाळाही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासंबंधी राज्याला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही जिल्ह्यांतील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यामध्ये अहमदनगरचा समावेश आहे.
मागील तीन दिवस जिल्ह्यातील दैनंदिन रुग्ण संख्या घटत असल्याचे दिसून येत होते. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ७०० च्या खाली आली होती. सर्वच तालुक्यांत शंभरच्या आत रुग्ण होते. आता ही संख्या पुन्हा वाढली आहे. बुधवारी जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९०८ वर गेली. त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. संगमनेर व पारनेर तालुक्यात रुग्णसंख्येने पुन्हा शंभरी ओलांडली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक १५२ रुग्ण संगमनेर तालुक्यात आढळून आले. त्या खालोखाल १३३ रुग्ण पारनेरमध्ये आढळून आले. शेवगाव व पाथर्डीत प्रत्येकी ८४ रुग्ण आहेत. नगर शहरात २५ रुग्ण आहेत. सर्वांत कमी १० रुग्ण जामखेडमध्ये आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक राहण्याची स्थिती जून महिन्यापासून कायम आहे.
जिल्ह्यातील निर्बंध शिथील होणार की कायम राहणार?
निर्बंध शिथील करताना जेथे रुग्णसंख्या जास्त आहे, तेथे सवलत देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर काही सवलती देण्याचा आधिकार जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना देण्यात आला आहे. स्थानिक परिस्थिती पाहून त्यांनी निर्णय घ्यावेत, असं सांगण्यात आलं आहे. मात्र, नगर जिल्ह्यात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याने प्रशासनाकडून निर्बंध शिथील केले जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांत मिळालेल्या सवलती नगर जिल्ह्यात तूर्तास तरी मिळणार नाहीत, असं चित्र आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times