कोल्हापूर : सीमाप्रश्नाच्या वादातून बरखास्त केलेल्या महापालिकेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. बेळगावसह हुबळी-धारवाड व गुलबर्गा या तीन महापालिकेची निवडणूक ३ सप्टेंबर रोजी होणार असून यामुळे आता सीमाभागातील राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत लाखाहून अधिक मते देत एकीकरण समितीची ताकद दाखवणाऱ्या मराठी बांधवांना महापालिकेत भगवा फडकवण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.

आठ वर्षापूर्वी झालेल्या बेळगाव महापालिका निवडणुकीत एकीकरण समितीचा झेंडा फडकला होता. कर्नाटक सरकारने सर्व ताकद वापरूनही त्यांचा पराभव झाल्याने सरकारने राजकीय खेळी करत एकीकरण समितीची सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बेळगाव येथे एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी महापौर सरिता पाटील, उपमहापौर संजय शिंदे यांच्यासह एकीकरण समितीचे २८ नगरसेवक सहभागी झाले होते.

याबाबत सरकारने राजद्रोहाचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. महापालिकेवरील भगवा ध्वज काढून तेथे कन्नड रक्षक संघटनेने लाल पिवळा ध्वज फडकवला. सभागृहाची मुदत दोन वर्षापूर्वी संपल्यानंतर तेथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. प्रभाग पुनर्रचनेमुळे आणि नंतर करोना संसर्गामुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. ती आता जाहीर झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. येत्या १६ ऑगस्टपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख २३ ऑगस्टपर्यंत आहे. २४ ऑगस्टला अर्जांची छाननी होणार असून २६ ऑगस्टपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्यानंतर प्रचारासाठी केवळ सात दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. ३ सप्टेंबरला मतमोजणी तर ६ सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे.

नुकत्याच झालेल्या बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीत एकीकरण समितीच्या उमेदवारास १ लाखापेक्षा जास्त मते मिळाली आणि भाजपचा काठावर विजय झाला. भाजपला घाम फोडण्याचे काम समितीने केले. आता महापालिका निवडणूक जाहीर झाली आहे. पुन्हा एकदा मराठी बांधवांची वज्रमुठ दाखवत महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी जोरदार प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here