म. टा. प्रतिनिधी ।

राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील वर्चस्वाला शरद पवारांचे एकेकाळचे निष्ठावंत असणार्‍या चंदरराव तावरे यांनीच धक्का दिला होता. मात्र त्यानंतर गेल्या पाच वर्षांत शरद पवार कारखान्यात गेले नव्हते. मात्र या निवडणुकीनंतर शरद पवारांना सन्मानाने कारखान्यात आणू, असा शब्द अजित पवारांनी दिला होता. त्यामुळे राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनेलने बाजी मारली असल्याने कारखान्यात सत्ता परिवर्तन झाले आहे. मात्र सहकार बचाव गटांच्या उमेदवारांनी कडवी झुंज दिली आहे. त्यामध्ये चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरुशिष्यांच्या जोडीला यश मिळाले आहे.

वाचा:

उपमुख्यमंत्री यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने विजय मिळवून माळेगाव कारखाना ताब्यात घेतला आहे. मात्र चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरुशिष्यांच्या जोडीला चितपट करण्यात पवारांना यश आले नाही. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत साखर उद्योगातील तज्ज्ञ चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेवृत्वाखालील शेतकरी बचाव सहकारी पॅनेलने एकूण २१ जागांपैकी १५ जागांवर घवघवीत यश मिळवून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कारखान्याची सत्ता खेचून घेतली. अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलला फक्त सहा जागांवरच समाधान मानावे लागले होते. मात्र, यावर्षी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनेलने २१ जागांपैकी १७ जागेवर घवघवीत यश मिळविले आहे. तर, शेतकरी बचाव सहकारी पॅनेलला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

मतमोजणीला साडेतीन तास उशीर झाल्यामुळे रात्रभर मतमोजणीची प्रक्रीया सुरु होती. आज सकाळीही मतमोजणी पूर्ण करुनच यंत्रणा थांबणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान सांगवी आणि नीरावागज या गटामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पुन्हा मतमोजणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे येथे पुन्हा मतमोजणी घेण्यात आली असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने माहिती दिली.

माळेगावचे गटनिहाय विजयी उमेदवार

ब वर्ग प्रतिनिधी- स्वप्नील जगताप (राष्ट्रवादी)

माळेगाव- रंजन तावरे (सहकार बचाव), बाळासाहेब तावरे (राष्ट्रवादी), संजय काटे (राष्ट्रवादी.)

पणदरे- तानाजी कोकरे, केशवराव जगताप व योगेश जगताप (राष्ट्रवादी)

सांगवी- चंद्रराव तावरे व सुरेश खलाटे, अनिल तावरे (राष्ट्रवादी)

नीरावागज- मदनराव देवकाते, बन्सीलाल आटोळे (राष्ट्रवादी), प्रताप आटोळे (सहकार बचाव)

बारामती- नितीन सातव, राजेंद्र ढवाण (राष्ट्रवादी), गुलाबराब गावडे (सहकार बचाव)

महिला प्रतिनिधी- अलका पोंदकुले व संगीता कोकरे (राष्ट्रवादी)

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here