मुंबई: सामाजिक व राजकीय क्षेत्रात महाराष्ट्रानं देशाला अनेक उत्तुंग माणसं दिली. राष्ट्रीय पातळीवर मराठी माणसानं आपला ठसा देखील उमटवला. मात्र, स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही मराठी माणसाला पंतप्रधानपदाची संधी न मिळाल्याचं शल्य अनेकदा बोलून दाखवलं जातं. केंद्रीय परिवहन मंत्री यांना याबाबत विचारण्यात आलं असता, त्यांनी काहीसं वेगळं उत्तर दिलं आहे. (Nitin Gadkari on Marathi Manoos as Prime Minister)

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. ‘देशाच्या पंतप्रधानपदी महाराष्ट्राचाच व्यक्ती बसला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे. मग त्याची जात, धर्म, पंत आणि राज्य कोणतंही असो. मराठी माणूसच झाला पाहिजे किंवा महाराष्ट्रातीलच झाला पाहिजे, असं काही मला मान्य नाही. एखादा मराठी माणूस खरोखरच त्या पात्रतेचा असेल, तर भविष्यात कदाचित तो पंतप्रधान होईल. त्याला ती संधी मिळेल,’ असं स्पष्ट मत गडकरी यांनी मांडलं.

वाचा:

नितीन गडकरी हे केंद्र सरकारमधील सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. परिवहन मंत्री म्हणून त्यांनी देशभर कामाचा धडाका लावला आहे. अनेक राष्ट्रीय महामार्ग व अन्य कामे त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत. पंतप्रधान पदासाठी सक्षम नेता म्हणूनही त्यांच्याकडं पाहिलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर त्यांना मराठी माणसाच्या पंतप्रधान पदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, त्यांनी हे रोखठोक मत मांडलं.

वांद्रे-वरळी सी लिंक मुंबई-दिल्ली हायवेला जोडणार

सध्या एक लाख कोटी रुपये खर्चून दिल्ली-मुंबई महामार्ग बांधण्याचं काम सुरू आहे. त्याचं ५० ते ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. हा हायवे जेएनपीटीपर्यंत असणार आहे. या महामार्गाला ठाणे जिल्ह्यातून मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी ५० हजार कोटी रुपयांचा एक उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना आहे. महाराष्ट्र सरकारशी लवकरच त्याबाबत चर्चा करणार आहे. राज्य सरकारनं संमती दिल्यास हे काम सुरू होईल,’ असं गडकरी यांनी सांगितलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here