मुंबई: करोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळं राज्यात निर्बंध हळूहळू उठवले जात आहेत. येत्या १५ ऑगस्टपासून सर्वात मोठा अनलॉक होणार आहे. मात्र, धार्मिक स्थळं उघडण्याबाबत सरकारनं कुठलाही निर्णय न घेतलेला नाही. मंदिरं उघडण्यासाठी सुरुवातीपासून आग्रही असलेल्या भारतीय जनता पक्षानं सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी या संदर्भात ट्वीट करून इशारा दिला आहे. ‘राज्य सरकारनं बिअर बार, वाइन्स शॉप सुरू करून बरेच दिवस झाले आहेत. दारूच्या दुकानांना परवानगी मिळते, तर मंदिरांना परवानगी का नाही? मुंबईसह महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांनी दैनंदिन कामं पुन्हा सुरू केली आहेत. तरीही मंदिरं बंद का? मंदिरं सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी द्यावी. अन्यथा, येत्या मंगळवारी आम्ही नियमांचं पालन करत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार,’ असं राम कदम यांनी म्हटलं आहे. तसंच, भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आज शिर्डीत आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे साईबाबांना घातलं जाणार आहे.

येत्या १५ ऑगस्टपासून मुंबईतील लोकल ट्रेनसोबतच दुकाने, मॉल, हॉटेल रात्री १० पर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मंदिरं आणि चित्रपटगृहे मात्र कुलुपबंदच राहणार आहेत. त्यामुळं संबंधित घटकांमध्ये नाराजी आहे. राज्यातील मंदिरं आणि देवस्थानांवर हजारो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. श्रावणाच्या सणासुदीच्या महिन्यात देवस्थानं उघडण्यास परवानगी मिळाल्यास या सर्वांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळं मंदिरंही नियमांसह खुली करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपनं केली आहे.

वाचा:

मागील वर्षीच्या लॉकडाऊननंतर देखील भाजपनं मंदिरांसाठी राज्यभर घंटानाद आंदोलन केलं होतं. यंदा पंढरपूरच्या पायी वारीसाठी आग्रह धरला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपनं मंदिरांसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. लोकल ट्रेनसाठी देखील मुंबईत असंच आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं त्याबाबत सावध निर्णय घेतला. त्यामुळं आता मंदिरांच्या बाबतीत काय निर्णय होतो, हे पाहावं लागणार आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here