रत्नागिरी: सरकारं प्रकल्प आणत असतात मात्र सध्याचं राज्यातलं सरकार प्रकल्पविरोधी आहे, असा आरोप करत शिवसेनेने विरोधाची भूमिका बदलून कोकणातील जनतेची मागणी लक्षात घेऊन येथे रिफायनरी प्रकल्प आणावा, अशी मागणी कोकणातील भाजप नेत्यांनी केली आहे.

भाजपच्या वतीने आज राज्यभरात राज्य सरकारविरुद्ध धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा भाग म्हणून रत्नागिरीतही धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी रिफायनरीच्या मागणीवर जोर देण्यात आला. माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनात भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी भाजपच्या अनेक नेत्यांची भाषणे झाली. या सर्वांनीच राज्यातील आघाडी सरकारवर निशाणा साधला.

निलेश राणे यांनी यावेळी आघाडी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. महाविकास आघाडीचे सरकार जनतेला मान्य नाही. गेल्या तीन महिन्यांत या सरकारने केवळ योजना व प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम केले. मागच्याच आठवड्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सुमारे ९०० शाळा बंद पाडण्याचे काम केले, असा आरोप निलेश यांनी केला.

दरम्यान, निलेश राणे यांचा पूर्वी राजापूरमधील नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध होता. मात्र आता त्यांचा विरोध मावळला आहे. हा प्रकल्प व्हायला हवा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. भाजपकडून त्याचं स्वागत करण्यात आलं. शिवसेनेच्या दबावामुळे स्थानिक शेतकरी, पक्ष कार्यकर्ते प्रकल्पाच्या विरोधात होते मात्र आपण जे करतोय ते चुकीचे आहे, हे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे. या प्रकल्पाचे समर्थन वाढत आहे. भाजपच्या भूमिकेला मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच जनतेचा आवाज लक्षात घेऊन राज्यातील सरकार हा प्रकल्प मार्गी लावेल, अशी अपेक्षा या धरणे आंदोलनात व्यक्त करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष, स्थानिक नगरसेवक, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. देवरूख, संगमेश्वर तालुक्यातही अशाचप्रकारे भाजपने आंदोलन केले.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here