नांदेड : नांदेडमध्ये रात्री एका तासात एकावर गोळीबार आणि दुसऱ्या घटनेत पिस्तुलाचा आणि तलवारीचा धाक दाखवून सात लाखाची रोकड लुटल्याच्या घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. शहरात जर अशा प्रकारे नागरिकांना धाक दाखवण्यात येत असेल तर ही चिंतेची बाब आहे.

शहरातील मध्यवर्ती भागात ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांत भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. श्रीनगर भागात असलेल्या अॅक्वा वॉटर फिल्टर प्लान्टवर बसलेल्या भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सोनू कल्याणकर यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. दैव बलवत्तर म्हणून सोनू कल्याणकर गोळीबारातून बचावले. ही संपुर्ण घटना सिसीटीव्हीत कैद झाली आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत गोकुळनगर येथील सिमेंट व्यापारी हनुमान अग्रवाल हे दुकान बंद करुन घराकडे निघत असताना दोन दरोडेखोरांनी अग्रवाल यांच्यावर एकाने पिस्तुल आणि एकाने तलवारीची धाक दाखवत सात लाखांची रोकड असलेली बॅग पळवली. दोन्ही घटनामध्ये पिस्तुलाचा वापर झाल्याने नांदेडमध्ये गुन्हेगारीनं चांगलंच डोक वर काढल्याचं दिसत आहे.

अधिक माहितीनुसार, घटनास्थळावर पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी भेट देऊन गुन्हेगारांच्या शोधात पथके रवाना केली आहेत. तर परिसरात पोलिसांचा धाक आणखी वाढला पाहिजे, जेणेकरून नागरिकांमध्ये भीती राहणार नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here