‘मी दिल्ली- मुंबई हायवे एक लाख कोटींचा बांधत असून तो जेएनपीटीपर्यंत आहे. त्याचं ५० ते ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. हा महामार्ग वरळी सी- लिंक पर्यंत पोहोचवण्याचे माझं स्वप्न आहे. त्यासाठी ५० हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा करणार असून संमती मिळाल्यास हा पूल बांधायला घेणार,’ असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
‘या पुलाबाबत अभ्यास सुरू झाला आहे. हा पूल असता तर वेस्टर्न एक्स्प्रेस-वेवर गर्दी झाली नसती. हा पूल झाला नाही याचं मनात शल्य आहे. म्हणूनच हा पूल बांधायचं डोक्यात आहे. मुंबईत मेट्रोलच्या वरही पूल झाले असते तर वाहतुकीची कोंडी सुटली असती. पण वरळी सी-लिंक प्रोजेक्ट करुन रस्ता वाढवू,’ असंही गडकरींनी सांगितलं आहे.
दरम्यान, ‘मुंबईला तिन्ही बाजूनं समुद्र असून विकास होण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाहीये. नवी मुंबईतही गर्दी झाली आहे. त्यामुळं महाराष्ट्र सरकारने पुढील २५ वर्षांचं व्हिजन तयार केले पाहिजे. तसं केल्यास महाराष्ट्र अजून पुढे जाईल आणि गरिबी, भूकबळी यातून मुक्त होईल,’ असा ठाम विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times