परभणी : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं महाविकास आघाडी सरकार राज्यात सुरळीतपणे सुरू आहे. मात्र, परभणीत आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं दिसून येतं. परभणीत शिवसेना खासदार संजय जाधव यांनी जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसला पायाखाली तुडवू असं विधान केलं होतं. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये एकच वादंग पाहायला मिळत आहे.

यावेळी जाधवांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर ही खालच्या भाषेत टीका केली होती. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खासदारांनी दिल्लीत माध्यमांशी बातचीत करताना दिलगिरी व्यक्त केली. तसेच मी कुठलाही गैरप्रकार करत नाही. जर काही गैर कृत्यात आढळलो तर राजकीय सन्यास घेण्याचं जाधवांनी सांगितलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकरणात भरपूर आक्रमक झालेली दिसून येते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनी खासदार जाधव यांच्यावर एका भूखंड प्रकरणात तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर दबाव टाकत चुकीचा फेर लावण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप केला आहे. त्याचे पुरावेही त्यांनी दाखवले आहेत. आता जबाबदारी स्वीकारून खासदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

सोशल मीडियावरही दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत फेसबुक पेजवरून खासदारांविरोधात अनेक पोस्ट केल्या गेल्या आहेत. त्यामुळे राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार सुरळीतपणे चालत असलं तरी परभणी जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं दिसून येतं. येणाऱ्या दिवसातही कटुता आणखी किती खोल जाईल हेच पाहणे आता औसुक्याचे राहणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here