हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला आहे.
‘महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान यापूर्वीच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत आणि राजकीय स्वार्थातून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘कोण जेम्स लेन?’
राज्यातील जात अस्मितेवर पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘कोण जेम्स लेन? कुठून आला जेम्स लेन? कसलं पुस्तक लिहिलं त्याने? बरं तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? कुठे आहे तो? काय करतो तो? या सगळ्यातून फक्त हे कोणी लिहिलं तर मग हे ब्राह्मणांनी लिहिलं…मग मराठा समाजातील तरुण-तरुणींपर्यंत पोहोचवलं गेलं. हे सगळं डिझाइन आहे,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी राजकीय स्वार्थासाठी या गोष्टी केल्याचा आरोप केला आहे.
या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी राज्य आणि देशातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. तसंच लोकसंख्या वाढ हे देशासमोरील सर्वात मोठं आव्हान असून याबाबत सरकारने पाऊल उचलण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यातील जातीय राजकारणाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी केलेल्या गंभीर आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमकं काय उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times