: वेतन अनुदान मंजुरीच्या प्रकरणात मध्यस्थाकरवी ८ लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्याविरुद्ध शिस्तभंग तसेच निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे अप्पर सचिव सं. द. माने यांनी याबाबत शिक्षण आयुक्तांना पत्र दिलं आहे.

या लाचखोरीच्या प्रकारामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन झाली असून, डॉ. झनकर तसेच अन्य संबंधितांवर कारवाई करण्याबाबत तसेच त्यांच्या निलंबनाबाबतचा स्पष्ट प्रस्ताव शिक्षण आयुक्तांनी शिक्षण विभागाला सादर करावा, असं या पत्रात सांगण्यात आलं आहे.

या प्रकारामुळे शिक्षण विभागही हादरला असून डॉ. झनकर यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

नेमकं काय घडलं होतं?
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना नुकतेच आठ लाख रुपयांची लाच घेताना नाशिक शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ठाणे येथील एसीबीच्या पथकाने नाशिक पथकाच्या मदतीने ही कारवाई केली. झनकर यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र नंतर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर या फरार झाल्या. त्यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणात प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि वाहनचालक ज्ञानेश्वर येवले या दोघांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here