वाचा:
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. मुंबईतील डेल्टा प्लसने झालेला हा पहिला मृत्यू असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ही महिला पूर्व उपनगरात राहणारी होती. मधुमेहासह अन्य आजारांमुळे गुंगागुंत वाढत जाऊन या महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत बुधवारी डेल्टा प्लसचे ७ रुग्ण आढळले होते. त्यात या महिलेचा समावेश होता, अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली. संबधित महिलेने करोनावरील लसचे दोन्ही डोस घेतले होते. कोरडा खोकला, अंगदुखीचा त्रास या महिलेला होत होता. तोंडाची चवही गेली होती. त्यानंतर कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात महिलेवर उपचार सुरू होते. ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्यानंतर रेमडेसिवीर आणि स्टेरॉइड्स त्यांना देण्यात येत होते. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून डेल्टा प्लस विषाणूची लागण होऊन महिलेचा मृत्यू झाल्याचे जीनोम सीक्वेन्सिंगमध्ये स्पष्ट झाले आहे. डेल्टा प्लसचा हा राज्यातील दुसरा मृत्यू ठरला आहे. जूनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये डेल्टा प्लसने महिलेचा मृत्यू झाला होता. चिंतेची बाब म्हणजे या महिलेच्या कुटुंबातील ६ जणांना संसर्गाची लागण झाली असून त्यातील दोन जण बाधित असल्याची माहितीही संबंधित अधिकाऱ्याने दिली.
राज्यात डेल्टा प्लसचे ६४ रुग्ण
राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २० नवे रुग्ण बुधवारी आढळले. त्यामुळे डेल्टा प्लस बाधित एकूण रुग्णांची संख्या ६५ वर पोहचली. नव्याने आढळलेल्या २० रुग्णांपैकी मुंबई येथे ७, पुणे येथे ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर येथे प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला येथे प्रत्येकी १ रुग्णांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले होते. त्यापैकी मुंबईतील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times