बेलसर गावामध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक आरोग्य संस्था गावात जाऊन विविध चाचण्या करत आहेत. या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून गाव पंचायतीकडून कंडोमचे वाटप करण्यात आले आहे. पुढचे किमान चार महिने गावात महिलांनी गर्भधारणा टाळली पाहिजे असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला.
यामुळे याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचे वाटप करण्यात आले. पुरुषांच्या वीर्यात मोठ्या प्रमाणात झिका आढळत असल्यामुळे लैंगिक संबंध टाळण्यासाठी हा प्रयत्न आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील ७९ गावांत झिका व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता आहे. या गावांत अलर्ट जारी केली आहे. तसंच, स्थानिक प्रशासन व सर्व ग्रामपंचायत यांना खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या गावांची यादीही जाहीर केली आहे.
या ७९ गावांत मागील तीन वर्षांपासून डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. ही गावे झिका व्हायरससाठी अति संवेदनशील आहेत. त्यामुळं गावातील लोक व अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
झिका व्हायरस काय आहे?
झिका विषाणूचा संसर्ग हा डासांच्या एडीज प्रजातीद्वारे पसरतो. एडीज डासांमुळं डेंग्यू आणि चिकनगुनिया विषाणू देखील पसरतात. पण हा आजार जीवघेणा नाही. मात्र, तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. बाळांमध्ये मायक्रोसेफॅली हा दुर्मिळ दोष निर्माण होऊ शकतो. या बाळांचं डोकं जन्माच्या वेळी लहान असू शकतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times