लंडन : लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी हिरमोड केला, पण गोलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी केली. त्यामुळे भारताला दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या तीन फलंदाजांना बाद करता आले आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची ३ बाद ११८ अशी स्थिती असून भारताला तिसऱ्या दिवशी आघाडी घेण्याची आता सुवर्णसंधी असेल.
आजच्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर लोकेश राहुल बाद झाला. राहुलने यावेळी १२ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १२९ धावांची सर्वोत्तम खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर अजिंक्य रहाणेच्या रुपात भारताला अजून एक मोठा धक्का बसला. अजिंक्यला फक्त एका धावेवर समाधान मानावे लागले. भारताला दुसऱ्या दिवशी फक्त सात चेंडूमध्येच दोन धक्के बसले होते. त्यानंतर रवींद्र जडेजाने भारताचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला. पण जडेजाला तळाच्या फलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे मोठी फटकेबाजी करण्याच्या नादात जडेजा ४० धावांवर बाद झाला. भक्कम सुरुवातीनंतर भारतीय संघ आज किमा चारशे धावांचा पल्ला गाठेल, असे वाटले होते. पण भारताचा पहिला डाव यावेळी ३६४ धावांमध्ये संपुष्टात आला.

इंग्लंडने आपल्या डावाची सुरुवात संथपणे केली. पण भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मह सिराजने इंग्लंडला सुरुवातीचे दोन धक्के दिले. सिराजने यावेळी २३ धावांवर डॉम सिब्ली आणि हसीब हमीद यांना बाद केले. सिब्लीने यावेळी ११ धावा केल्या, तर हमीदला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर स्थिरस्थावर झालेला सलामीवीर रॉरी बर्न्सला मोहम्मद शमीने बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. बर्न्सचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले. बर्न्सने यावेळी सात चौकारांच्या जोरावर ४९ धावांची खेळी साकारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा कर्णधार जो रुट हा नाबाद ४८ धावांवर आणि जॉनी बेअसस्टो हा नाबाद ६ धावांवर खेळत होता. त्यामुळे भारताकडे अजूनही २६४ धावांची दमदार आघाडी आहे. त्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात,याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here