सांगली : बैलगाडी व छकडा शर्यतींचे आयोजन करण्यात बंदी असतानाही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. आटपाडी तालुक्यातील झरे येथे २० ऑगस्टला शर्यत होणार असून, यासाठी त्यांनी बैलगाडी मालकांना निमंत्रित केले आहे. बैलगाडी शर्यतीची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू आहे. बंदी झुगारून केलेल्या आयोजनानंतर बैलगाडी शर्यत पार पडणार, की पोलिसांकडून कारवाई होणार, हे आता पाहवे लागणार आहे.

बैलगाडी शर्यतींमध्ये बैलांचा छळ होत असल्याने याच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदी सरकारने उठवावी या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैल हा त्याच्या घरचा सदस्य असल्याने मारहाण किंवा छळ केला जात नाही. विना लाठीकाठी स्पर्धांना सरकारने पूर्वीप्रमाणे परवानगी द्यावी, असा आग्रह शेतकऱ्यांसह काही लोकप्रतिनिधींनीही धरला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी बंदी झुगारुन बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे.

आटपाडी तालुक्यातील झरे येथे २० ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता बैलगाडी शर्यतीस सुरुवात होणार आहे. शर्यतीमधील प्रथम क्रमांक विजेत्या बैलगाडी मालकाला १ लाख ११११ रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी ७७ हजार ७७७ रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी ५५ हजार ५५५ रुपये, तर चौथ्या क्रमांकासाठी २२ हजार २२२ रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

बैलगाडी शर्यत ही कृषी संस्कृतीतील महत्त्वाची परंपरा असल्याने तिच्या अस्तित्वासाठी आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेसाठी शर्यतीचे आयोजन केल्याचे आमदार पडळकर यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत शर्यती पार पाडणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र शर्यतींवर बंदी असल्याने आता पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून शर्यतीचे आयोजन उधळून लावली जाणार, की आयोजक आमदार पडळकर यांच्यावर कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here