परभणी तालुक्यातील पाथरी रॉड येथील जांब शिवारात भीमराव पवार या प्रगतिशील शेतकऱ्याने अवघ्या अडीच एकर शेतामध्ये ‘ड्रॅगन फ्रुट’ या फळाची लागवड केली. पवार यांनी अहमदनगर, हैदराबाद आणि पुणे येथून रोपे विकत आणली आणि अडीच एकर शेतीमध्ये एक हजार रोपांची लागवड केली.
ड्रॅगन फ्रुट या पिकाला सुरुवातीला एकरी चार लाख रुपये खर्च असून या रोपाचा आयुष्य ३० ते ४० वर्ष आहे. विशेष म्हणजे पवार यांनी शेतामध्ये संपूर्ण सेंद्रिय खताचा वापर केला. त्यामुळे त्यांना उत्पन्नही चांगलं झालं. शिवाय पवार यांना त्यांच्या उच्चशिक्षित मुलाचं सहकार्यही लाभलं.
बाजारात ड्रॅगन फ्रुटला मागणीही चांगली आहे. साधारणतः दोनशे ते अडीचशे रुपये प्रति किलोने हे फ्रूट बाजारात विकलं जातं. त्यातून पवार यांना एकरी सहा लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. सध्या लाल आणि पांढरा फळ उपलब्ध आहे. फळ विक्रीसाठी पवार यांनी आता ऍडव्हान्स बुकिंगही चालू केली आहे.
योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर आणि इच्छा शक्ती असेल तर कमी शेतातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येते, हे भीमराव पवार या प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. शेतीला जोड धंदा म्हणून फळबागचा विचार इतर शेतकऱ्यांनीही करावा व ड्रॅगन फ्रुटची लागवड करत अधिक उत्पन्न मिळवावे असा सल्ला भीमराव पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times