करोनामुळे पती गमावलेल्या महिलांची संख्या मोठी आहे. त्यांना मदत करण्यासाठी करोना एकल महिला पुनर्वसन समितीमार्फत विविध पातळ्यांवर पाठपुरावा करण्यात येत आहे. महिलांसाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध योजना राबवल्या जात असतात. त्या अनुषगांने जिल्हा परिषद प्रशासनासोबत बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, समितीचे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
समितीने आणखी कोणत्या मागण्या केल्या?
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांच्या योजनांमध्ये या महिलांना प्राधान्यक्रम द्यावा, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली. या विधवा महिलांचे सर्वेक्षण व्हावे, महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असलेल्या समितीची स्थापना करावी, बालसंगोपन योजना यशस्वी होण्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, अंगणवाडी यांच्या मदतीने लाभार्थीचे फॉर्म भरून अकराशे रूपयांचा लाभ देणे, अंगणवाडी भरती व जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांमध्ये या विधवा महिलांना प्राधान्यक्रम देणे, पंधराव्या वित्त आयोगात महिलांसाठी खर्च करण्यासाठी उपलब्ध असलेल्या रकमेचा खर्च या महिलांसाठीच करण्यात यावा, संजय गांधी निराधार योजनेचे कॅम्प बाजाराच्या गावी घेण्यात यावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी यासंबंधी सकारात्मक भूमिका जाहीर केली. यासंबंधी सर्व खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. बाल संगोपन योजनेत जिल्ह्यातील प्रत्येक गरजू मुलाचा समावेश करण्यात येईल. अंगणवाडी भरतीसह विविध योजनांमध्ये या महिलांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल. या महिलांचा त्यांच्या गावातील बचत गटांमध्ये समावेश करण्यात येऊन रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संजय गांधी निराधार योजनेबाबत बाजाराच्या गावी कॅम्प घेण्यासही अधिकार्यांनी सकारात्मकता दर्शविली. या महिलांना सरकारने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडणार असून जिल्हा परिषद या महिलांसाठी प्रायोगिक स्वरूपाचे पथदर्शक काम करेल. हा पॅटर्न महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाकचौरे यांनी व्यक्त केला.
त्यानंतर समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचीही भेट घेतली. जिल्ह्यातील विधवा महिलांचे सर्वेक्षण करावे, जिल्ह्याच्या टास्क फोर्समध्ये विधवांसाठी काम करणार्या समिती सदस्यांचा समावेश करावा. या महिलांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी टास्क फोर्सने पुढाकार घ्यावा. संजय गांधी निराधार योजनेत सुलभीकरण करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. यावर टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times