यावेळी बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या १४१ शाळांमधून ‘माझी शाळा, आदर्श शाळा’ उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या १४१ शाळांसाठी १६६ नवीन वर्गखोल्या मंजूर केल्या आहेत. तर १३० शाळांमध्ये ९१७ वर्ग खोल्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. १४१ मॉडेल स्कूलमध्ये भौतिक सुविधा व गुणवत्ता विकास सुरू आहे. जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईनद्वारे शिक्षण प्रवाहात ठेवण्यात येत आहे. शासन आणि प्रशासन यांची मोट व्यवस्थित बांधली जाऊन विकासाची फळे शेवटच्या घटकांपर्यत पोहोचतील अशी व्यवस्था केली जात आहे.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणलेल्या उत्कृष्ट तपासाबाबत केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आलेले सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विशेष सेवा पदक जाहीर झालेले पोलीस उपनिरीक्षक उमेश चिकणे, किरण मगदूम, युवराज घोडके व पोलीस महासंचालक यांचा आणि सन्मानचिन्ह जाहीर झालेले पोलीस हवालदार मनोज नीळकंठ, पोलीस नाईक अविनाश लाड, महिला पोलीस नाईक तेजस्विनी पाटील, महिला पोलीस शिपाई सुधा बाबुराव मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
महाआवास अभियान ग्रामीणमधील उत्कृष्ट काम करणाऱ्यांमध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या ग्रामपंचायत भूड, ता. खानापूर, राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम आलेल्या ग्रामपंचायत जाखापूर ता-कवठेमहांकाळ आणि प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्यपुरस्कृत आवास योजनेत प्रथम तालुका म्हणून कवठेमहांकाळ तालुक्याचा सत्कार करण्यात आला. महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विवेकानंद हॉस्पिटल, बामनोली या रुग्णालयाला पुरस्कार देण्यात आला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times