उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गरीब व गरजूंना फक्त दहा रुपयांत जेवणाची थाळी देणारी सुरू केली आहे. २६ जानेवारीपासून राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला प्रायोगित तत्वावर राज्यातील ५० ठिकाणी ही योजना सुरू झाली होती. त्यानंतर या योजनेचा आढावा घेऊन राज्यभरात या योजनेच्या अंमलबजावणीचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले होते. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी प्रसादाच्या रुपानं हातभार लावता यावा यासाठी पाच कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासानं केली आहे. यासंबंधीची माहिती आदेश बांदेकर यांनी दिली. विश्वस्त मंडळानं एकमतानं हा निर्णय घेतला आहे. न्यासातर्फे नेहमीच मदतीचा हात पुढे केला जातो. शिवभोजन योजनेंतर्गत गरिबांना अल्प दरात जेवण दिलं जातं. त्यामुळं या योजनेला हातभार लावावा, या अनुषंगानं विश्वस्त मंडळानं ५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. निधीला मान्यता मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल. मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ हा निधी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात येईल, अशी माहिती बांदेकर यांनी दिली आहे. हा निधी देऊन या शिवभोजन योजनेला हातभार लावल्याबद्दल विश्वस्त मंडळाचा आभारी आहे, असंही ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times