शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून शिवसेनेनं फाळणी वेदना स्मृतीदिनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री स्वातंत्र्याचे स्वागत करताना पंडितजींनी नियतीशी दीर्घकाळापूर्वी झालेल्या संकेताचे स्मरण करुन दिले. २४ वर्षांनंतर नेहरुंच्याच कन्या इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान या नात्याने जेन्हा ३ डिसेंबर १९७१ रोजी मध्यरात्रीनंतर पाकिस्तानी आक्रमणाचा पूर्णतः पडाव करण्याचा निर्धार आकाशवाणीवरुन जाहीर केला आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यसंग्रामात देशाला सहभागी केले,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी घडवून पहिल्या फाळणीच्या वेदनेवर फुंकर घातली. पाकिस्तानच्या द्विराष्ट्रवादाचा पायाच उखडून टाकला. फाळणीची वेदना होती व आहेच. फक्त या वेदनेतून आणखी एका फाळणीची बीजे रोवली जाऊ नयेत हे सध्याच्या राज्यकर्त्यांनी पाहायला हवे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘दोन्ही देशांमधली दुभंगलेली मनं दुरुस्त करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लाहोरला बस घेऊन गेले. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी अचानक गेले. ही वेदना संपावी हे मोदींच्याही मनात होतेच. आता त्यांनी त्या वेदनेची खपली उचकटून काढली,’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
‘फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा यावर चिंतन झाले असते तर बरे झाले असते,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times