‘स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही काँग्रेस पक्षाने देशाच्या ज़डणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काँग्रेसच्या सरकारने नियोजनपूर्वक आखणी करुन विकासकामे राबवली, त्यातूनच पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, शिक्षण, रस्ते, पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था उभी राहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि काँग्रेस विचाराने देशातील एकात्मता कायम ठेवली गेली. परंतु मागील ७ वर्षापासून ही सर्व व्यवस्थाच मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. काँग्रेस पक्षासाठी संविधान व देशाची एकात्मता सर्वोच्च असून ती अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करत आहोत,’ असं नाना पटोले म्हणाले.
‘तेच लोक धर्माच्या नावावर देश तोडण्याची भाषा करत आहेत’
‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियानाअंतर्गत नाना पटोले औरंगाबादमधील कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्या लोकांचा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग नव्हता तेच लोक धर्माच्या नावावर देश तोडण्याची भाषा करत आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविदांने नांदत असताना धर्माच्या नावावर राजकारण करुन तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे,’ असा गंभीर आरोप पटोले यांनी भाजपवर केला आहे.
‘१४ ऑगस्ट हा दिवस स्मृती दिवस म्हणून साजरा करण्याचा भाजपाचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला. ज्या दिवशी देशात रक्तपात झाला त्या दिवसाच्या स्मृती कशाला जागृत करता? देशात मागील ७ वर्षांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. सरकारच्या विरोधात लिहिणाऱ्या-बोलणाऱ्यावर कारवाई केली जाते. शेतकरी ९ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, त्याची साधी दखलही पंतप्रधान घेत नाहीत. बेरोजगारी, महागाईचा प्रश्न गंभीर असून देशातील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तरुणांनीच आवाज बनून उभे ठाकले पाहिजे,’ असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times