रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळलेल्या डेल्टा प्लस बाधित रुग्णांमधील सर्व रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यापैकी नवीन ३ रुग्णांची माहिती रविवारी राज्य स्तरावरून कळवण्यात आली आहे. हे तीन रुग्ण जुलै २०२१ मध्ये कोविड बाधित म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उपचार घेत होते. यातील दोन रुग्ण आंगवली आणि एक रुग्ण धामणी येथील आहेत. हे तीनही रुग्ण उपचाराअंती पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कोल्हापूरमध्येही आढळले डेल्टा प्लसचे रुग्ण
रविवारी आलेल्या अहवालानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सहा करोनाबाधित रूग्णांच्या शरीरात डेल्टा प्लसचे विषाणू असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये कोल्हापूर शहरात तीन, हातकणंगले तालुक्यात दोन तर करवीर तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. शहरात सापडलेला एक रूग्ण विचारे माळ तर दोन रूग्ण साने गुरूजी वसाहत परिसरातील आहेत. विशेष म्हणजे त्यांचा अहवाल रविवारी आला असला तरी हे सर्व रूग्ण यापूर्वीच बरे झालेले आहेत. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
दरम्यान, ज्या भागात डेल्टा प्लसचे रूग्ण सापडले आहेत, त्या भागात तातडीने नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका, जिल्हा परिषदेसह आरोग्य विभागाची यंत्रणा गतीमान झाली आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times