पुणे: शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री चौघांना अटक केली. या प्रकरणी भोसले यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेत ७१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून गैरव्यवहाराची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे.

बँकेचे संचालक अनिल भोसले यांच्यासह एस. व्ही. जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी पडवळ, बँकेचे अधिकारी शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. भोसले यांच्यासह अटक करण्यात आलेल्या चौघांनाही बुधवारी दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत.

घोटाळा असा झाला उघड…

भारतीय रिझर्व्ह बँकने (आरबीआय) शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे रिझर्व्ह बँकने २०१८-१९ चे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बँकेचे ऑडिट केले असता त्यामध्ये ७१ कोटी ७८ लाख रुपये कमी असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये बॅकेचे संचालक असलेले आमदार भोसले यांच्यासह शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमान सोरते यांच्यासह ११ पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सनदी लेखापाल (सीए) योगेश लकडे यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. भोसले यांच्यासह अकरा जणांनी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी दाखवल्या होत्या. ऑडिट करताना या नोंदी बनावट असल्याचे आढळून आले होते. बँकेच्या एकूण १४ शाखा असून, एकूण १६ हजार खातेदार आहेत. बँकेकडून आतापर्यंत १२ कोटी रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here