मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. तेव्हापासून देशमुख यांच्या मागे चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर तपासातून इतरही काही बाबी समोर आल्या होत्या. त्यानंतर ईडीनं हे प्रकरणात सखोल तपास सुरू केला. त्यातून मनी लाँड्ररिंगचं प्रकरण पुढं आलं. त्यानंतर देशमुख यांच्या चौकशीसाठी ईडीनं चार वेळा समन्स बजावलं होतं. मात्र, करोनाची साथ, वय आणि ईडीच्या कारवाई अन्याय्य असल्याचं सांगत त्यांनी चौकशीला हजर राहणं टाळलं आहे.
वाचा:
ईडीनं अनिल देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरांवर व कार्यालयांवर छापे टाकले आहेत. त्यांच्याशी संबंधित शिक्षण संस्थांवरही छापे टाकले आहेत. मात्र, देशमुख अद्याप ईडीच्या समोर हजर झालेले नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणांनी आपल्याविरोधात कुठलीही कठोर कारवाई करू नये अशी मागणी करणारी याचिका दरम्यानच्या काळात देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं त्यांना कारवाईपासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर ईडीनं पाचव्यांदा समन्स बजावल्याचं समजतं.
वाचा:
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांना १८ ऑगस्ट रोजी ईडीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ईडीसमोर हजर राहीन असं देशमुख यांनी मागील महिन्यात एक व्हिडिओ शेअर करून सांगितलं होतं. आता न्यायालयाचा निकाल आला असून ईडीनं समन्सही बजावलं आहे. त्यामुळं देशमुख उद्या हजर राहतात का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times