कोल्हापूर: जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यात सुमारे १७ कोटी ४२ लाखाचा निधी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांना आगाऊ मदत देण्यासाठी प्राप्त झाला आहे. तसंच लवकरच आणखी निधी प्राप्त होणार असून तो टप्प्या-टप्प्याने बाधितांना वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.

महापुरामुळे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे. पूरबाधित नागरिकांना मदत मिळावी यासाठी विविध स्तरातून मागणी करण्यात येत आहे. आता राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यातील निधी आला असून त्या-त्या तालुक्यातील बाधित नागरिकांना मदत देण्यासाठी हा निधी संबंधित तहसीलदार यांना वितरीत करण्यात येणार आहे.

आर्थिक मदत देण्यात येणारे तालुके पुढीलप्रमाणे-(रक्कम लाखांमध्ये)
करवीर-६४०, गगनबावडा-७.५०, आजरा-२.२०, शाहूवाडी-३७.३५, पन्हाळा-७८.५७५, राधानगरी-५.७५, भुदरगड-१०.२०, चंदगड-१०.२७५, गडहिंग्लज-४७.९५, कागल-६०.५२५, शिरोळ-५०७.८५, हातकणंगले-१३३.६७५

‘नुकसान भरपाई बाबत संभ्रम नको’
‘महापुरामुळे बाधित होऊन नुकसान झालेल्या सर्व नुकसानग्रस्तांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत महाविकास आघाडीचे सरकार बांधिल आहे. सर्वांना मदत मिळेल. त्यामुळे मदतीबाबत कोणीही संभ्रम बाळगू नये,’ असं आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केलं आहे.

दरम्यान, बाधित झालेली घरे, स्थलांतरित झालेली कुटुंबे, दुकाने, पशूधन, टपरीधारक, शेड व झोपड्या तसेच सानुग्रह अनुदानाची रक्कम याबाबतचा निर्णय झाला आहे. यापैकी सानुग्रह अनुदानाची रक्कम नुकसान धारकांना एक-दोन दिवसात प्राप्त होईल, शेती नुकसानीबाबतचे सर्वेक्षण सुरू असून सर्वेक्षणाचे अहवाल प्राप्त होताच शेती व शेती पिकांच्या नुकसानीबाबत धोरण निश्चित केले जाईल आणि शेती अंतर्गत येणाऱ्या नुकसानीसाठी शासनाकडून आर्थिक मदतीबाबतचे धोरण निश्चित करून तातडीने मदत देण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल,’ असंही राज्यमंत्री यड्रावकर यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here