राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन सध्या वातावरण तापले आहे. यावरुन पुन्हा एकदा शिवसेनेनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपला लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केले आहेत.
‘महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हा सर्वत्र चेष्टेचा विषय झाला आहे. पदाचे इतके अवमूल्यन व घसरगुंडी राज्यपाल साहेबांनी करुन ठेवली आहे. राजभवनातील घडामोडींचे आता जनतेला व सरकारलाही काही वाटेनासे झाले आहे. राज्यपालांच्या अधःपतनास जितके ते स्वतः जबाबदार आहेत त्यापेक्षा जास्त राज्यातील त्यांचा पितृपक्ष भाजप जबाबदार आहे,’ अशी खरमरीत टीका शिवसेनेनं केली आहे.
‘शरद पवारांनी राज्यपालांना त्याच्या नर्मविनोदी शैलीत सांगितले आहे, ‘१२ आमदारांच्या नियुक्त्यांबाबत निर्णय लवकर घ्या असे पत्र मुख्यमंत्र्यांनी पाठवले आहे. कदाचित वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात राहत नसेल.’ पवार यांनी सांगितले ते योग्यच आहे. आमदारांच्या नियुक्त्यांबाबत सरकारने आग्रह धरायला हवा, म्हणजे नक्की काय करायला हवे? राज्यपाल महोदयांनी पदाची शान राखून हे वक्तव्य अजिबात केलेले नाही. राज्यपालांकडे आग्रह धरायचा म्हणजे नेमके काय करावे? त्यांच्या राजभवनात जमून टाळ्या, थाळय़ा, घंटा वाजवून राज्यपालांचे लक्ष याप्रश्नी वेधून घ्यायचे, की आणखी काही करायचे? , असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
‘राज्यपाल हे केंद्राचे ‘पॉलिटिकल एजंट’ म्हणजे गृहखात्याचे वतनदार आहेत ही सोपी व्याख्या आम्ही सांगतो. मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवूनही राज्यपाल निर्णय घेत नाहीत. त्यांना स्मरणपत्र पाठवूनही १२ सदस्यांची फाईल पुढे सरकत नाही. म्हणजे नक्कीच त्यांचे मन साफ नाही व १२ आमदारांच्या नियुक्त्या करू नका असा त्यांच्यावर ‘वर’चा दबाव आहे. राज्यपालांनी घटनेची चौकट मोडली तर त्यांची इज्जत राहणार नाही व त्यांच्या इज्जतीशी सध्या त्यांचेच लोक खेळ करीत आहेत, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘१२ आमदारांच्या नियुक्त्या रखडवून भाजप व राज्यपाल स्वतःचेच हसे करून घेत आहेत. हा त्यांचा रडीचा डाव आहे व वैफल्याचे झटके आहेत. जनतेच्या मनातून त्यांचे स्थान घसरले आहेच. पण आता हायकोर्ट व शरद पवारांसारखे मोठे नेतेही खुलेआम टपल्या आणि थपडा मारू लागले आहेत,’ असा टोमणा शिवसेनेनं लगावला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times