नवी दिल्लीः आसाम-मिझोराम सीमावाद आणि इतर राज्यांमधील परिस्थितीचा मांडत काँग्रेस बुधवारी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ईशान्येतील राज्यांमध्ये देशाची घटना आणि सार्वभौमत्वाला खुलेआम आव्हान दिले जात आहे. पण केंद्र सरकार गप्प आहे, अशी टीका काँग्रेसने केली.

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे येऊन यावर उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. ईशान्येकडील राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. घटनेच्या रचनेवर हल्ला होत आहे. ईशान्येकडील राज्यांमधील स्थिती टीव्हीवर दाखवली जात नाहीए, असा आरोप सुरजेवाला यांनी केला.

दोन राज्यांचे पोलिस एकमेकांशी शत्रूसारखे वर्तन करत आहेत आणि नागरिकांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. ईशान्येतील राज्यांमध्ये कुठल्याही स्थितीत सत्ता बळकावण्याचा मोदी सरकारच्या धोरणांचा हा परिणाम आहे. देशावर त्याचे घातक परिमाण झाले तरी भाजप आणि मोदी सरकार सत्ता बळकावण्यासाठी प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप सुरजेवालांनी केला.

मोदी सरकारने मौन धारण करणं म्हणजे अंतर्गत सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे लक्षण आहे. केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आहे आणि बेजबाबदार व्यवहार करत आहे. आसाम-मिझोराम सीमेवर सतत पोलिसांचा गोळीबार, हिंसा आणि मृत्युंवर ते का बोलत नाहीए? या परिस्थितीपासून पळ का काढत आहेत?, असा सवाल सुरजेवाला यांनी केला.

मेघालयात अतिरेकी संघटना तालिबानसारखे शस्त्र झळकावत गाड्यांमधून खुलेआम फिरत होते. यामुळे तिथे ९८ तासांची संचारबंदी लागू करावी लागली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पेट्रोल बॉम्ब फेकले गेले आणि तिथल्या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. राज्यपालांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. का पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यावर बोलत नाहीत? असा प्रश्नही सुरजेवालांनी उपस्थित केला.

नागालँडमध्ये एसएससीएन-आयएम नावाच्या संघटनेने भारतीय राज्यघटना मानण्यास नकार दिला आहे. अरुणाचल प्रदेशात चीनने गावं वसवले आहे. ईशान्येतील पाच राज्यांमध्ये संघर्षाची स्थिती आहे. भारताच्या घटनात्मक आणि सीमांच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले जात आहे. मोदी सरकार देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाशी तडजोड करत आहे. हे स्वीकारलं जाणार नाही. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्र्यांनी समोर येऊन यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणीही काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here