जिल्हाधिकारी कार्यालयात आज यांच्या अध्यक्षतेखाली पुरपरिस्थितीमुळे झालेले नुकसान व पंचनाम्यांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्र. जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर वाकुरे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त श्री. पठाण, सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, भविष्यात पुरामुळे नागरिकांना धोका निर्माण होवू नये, यासाठी पूरबाधितांच्या पुनर्वसनावर राज्य शासनाचा भर आहे. जिल्ह्यातील पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाच्या दृष्टीने बाधित कुटुंबांची गावनिहाय यादी संबंधित तहसीलदारांनी तयार करावी. यात तालुक्यातील रस्ते व दळणवळणाच्या साधनांचे नुकसान, पुनर्वसन करणे आवश्यक असणारी गावे, यातील बाधित कुटुंबे, कुटुंबातील सदस्य संख्या, पुनर्वसन करण्यात येणारी जागा आदी सविस्तर तपशीलावर आधारित ‘सूक्ष्म आराखडा’ तयार करावा. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील गावांच्या पुनर्वसनांबाबत त्या त्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी, तहसीलदार, गट विकास अधिकारी व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन गतीने कार्यवाही करण्यात येईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पूर परिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. तहसीलदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या मदतीने नकाशे पाहून त्यानुसार नदी-ओढ्यांची पाहणी करुन पुररेषा निश्चित करावी. त्याचबरोबर ‘ओढ्यांना नंबरिंग’ करण्याच्या दृष्टीने माहिती घ्यावी. जेणेकरुन जिल्ह्यात १ नोव्हेंबर पासून नदी-ओढ्यांतील गाळ काढणे, खोलीकरण व रुंदीकरणाची मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात येईल.
क्लिक करा आणि वाचा-
पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेली घरांची व गोठयांची पडझड, पुरामुळे झालेले मयत व्यक्ती व जनावरे, शेतीचे नुकसान यांची अचूक माहिती घ्या, जेणेकरून जिल्ह्यातील एकही पूरबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही.
जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांसाठी सुमारे १७ कोटी ४२ लाख रुपयांचा सानुग्रह निधी वितरित होत असून उर्वरित अनुदानाचेही तात्काळ वाटप करावे, असेही त्यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
प्र. जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी बाधित नागरिक व गावांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील ५ हजार ७९५ घरांची अंशतः पडझड झाली असून ५ हजार २९० पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर १ हजार ८० घरांची पुर्णतः पडझड झाली असून ८२५ पंचनामे पूर्ण झाले आहेत. ७१ हजार २५८ हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असून ६५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिली.
संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी त्या त्या तालुका व उपविभागात अतिवृष्टी व पुरामुळे झालेले नुकसान व करण्यात आलेल्या पंचनाम्यांची माहिती दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times