कोकण रेल्वेच्या नातूनगर येथील बोगदा विद्युतीकरणाच्या कामासाठी आणलेल्या कामगारांनी १ लाख ३१ हजार ५०० रूपये किमतीच्या साहित्याची चोरी केल्याचा प्रकार घडला होता. काम सुरू असतानाच संशयित आरोपी विक्रम सायस वाघमारे वय ३८, अक्षय मारूती मदने वय २४,आकाश गणपती भालेराव वय २४ रा. रायका, ता. शिरूर, अनंतमाळ, जि लातूर यांनी चोरी केली होती.
खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुजीत गडदे, पोलीस हवालदार प्रकाश मोरे, पोलीस हवालदार आलीम शेख, पोलीस शिपाई संभाजी मोरपडवार यांच्या पथकाने लातूर येथे दाखल होत आरोपींच्या मुसक्या आवळत चोरीचा छडा लावण्यात यश मिळवलं. चोरीची ही घटना १५ ते १८ नोव्हेंबर २०२० या दरम्यान घडली होती. या प्रकरणी जोगीनेगी यांनी येथील पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या यशस्वी कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग, डीवायएसपी शशीकिरण काशिद, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी पोलिसांच्या टीमचं अभिनंदन केलं आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास खेडचे पोलीस हवालदार आलीम शेख करत आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times