सदर प्रकरणात ३६ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडितेचे २००५ मध्ये लग्न झाले. तिला एक मुलगा, मुलगी असून पीडिता व तिच्या पतीमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याने २०१५ पासून ती मुलांसोबत वेगळी राहते. पीडिता ही वाळुज परिसरात भोजनालय चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करते. भोजनालयाच्या माध्यमातून पीडितेची आरोपीशी ओळख झाली. आरोपीने पीडितेच्या भावाला नोकरी लावून देतो म्हणून पीडितेकडून ५० हजार रुपये घेतले. त्यातून त्यांची मैत्री वाढत गेली. आरोपीने पीडितेला लग्नाची मागणी घालून तिच्या मुलांना संभाळण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांच्यांत वारंवार शारीरिक संबंध आले.
नोव्हेंबर २०२० मध्ये आरोपीचे लग्न झाले असून त्याला दोन आपत्य असल्याचे पीडितेला समजले. ही बाब पीडितेने विचारली असता त्याने मी सर्वांना संभाळतो असं म्हणत वेळ मारुन नेली. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेकडून दीड लाख रुपये व सोन्या चांदीचे दागिने नेले. १५ ऑगस्ट रोजी पीडितेने आरोपीला दिलेले पैसे परत मागत लग्नासाठी तगादा लावला असता आरोपीने तिला जबर मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
या प्रकरणात बलात्कार करणाऱ्या प्रविण सुभाष राऊत याला गुरुवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी तसेच घटनास्थळाची पाहणी बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. कोर्टाने या विनंतीवरून आरोपीला २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times