म.टा. प्रतिनिधी, नगर: आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांचा संदर्भ देत आपल्याही मनात असाच विचार येत असल्याची एका महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. नगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील या वरिष्ठ महिला अधिकारी असल्याचे सांगितलं जात आहे. त्यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींवर आरोप करताना काही घटनांची उदाहरणेही दिली आहेत. या क्लीपमुळे खळबळ उडाली असून मधल्या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्याची भेट झाल्याचे व मतपरविर्तन झाल्याचे सांगण्यात येते.

वन अधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून त्यांनी ही ऑडिओ क्लीप केली आहे. महिला अधिकारी म्हणून होणारा त्रास, वरिष्ठांकडून केले जाणारे दुर्लक्ष, नोकरीत येताना केलेला निर्धार आणि प्रत्यक्षात झालेली निराशा असे सविस्तर कथन त्यांनी या क्लीपमध्ये केले आहे. मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही ऐकू येतात. हीच आपली सुसाईट नोट समजावी, असेही त्या म्हणत आहेत. तर कधी धीराने लढण्याची शिकवण असल्याचे सांगत आहेत.

त्यांनी म्हटले आहे, ‘दीपाली तू हे कृत्य केल्याचे मला तेव्हा आवडले नव्हते. पण आता एकूण त्रास लक्षात घेता तुझ्याच पाठी यावे, असे वाटत आहे. महिला अधिकारी म्हणून लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एका रथाची दोन चाके आहेत. मात्र, आपल्या चाकाने गती घेतली की घात झालाच समजा. कारण महिलांनी मागे राहणे हेच मनूने शिकविले. हे सगळे मनूचे अनुयायी आहेत. मग एकटीने वाट कशी चालायची? दीडशहाणी, आगाऊ अशी विशेषणे लावली जाणार. जो पर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आपल्याविरूद्ध उपोषण, मोर्चे, आंदोलने घडवून आणणार, असं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.

वाचाः

स्त्री जातीचा उजेड त्यांना सहन होत नाही. आंदोलनांवर नाही भागले तर तर विधानसभेत प्रश्न मांडायचा, जुन्या चुका उकरून काढून त्याचे भांडवल करायचे. मग चौकशांच्या जात्यातून जावे लागते. एवढे सहन करण्याची ताकद महिलांमध्ये कुठे आहे? मोठी जबाबदारी संभाळताना एखादी चूक होऊ शकते, मात्र महिलेला माफी नाही कारण अहिलेलासुद्धा माफी नव्हती. दीपाली, तुझ्या मार्गावर निघण्यापूर्वी मी घाई करतेय असे वाटत आहे. पण मी जरा कायद्याच्या वाटेने जाऊन पाहिले. खंडणी मागणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हा मला वाटले आता माझ्या धाडसाचे कौतूक होईल. मला म्हणतील ओ शेट तुम्ही नादच केला थेट. अशा थाटात सर्व अधिकारी वर्ग माझे जंगी स्वागत करतील. पण छे, असे काही झालं नाही. शेठ हे फक्त पुरूषला म्हणतात. बायांना कठे शेठ म्हणता येते?, असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

लहानपणी मला धीर देणारे माझे आजोबा होते. पुराणातील दाखले देत मला म्हणायचे हे पहा पोथ्या वाचून तुझे नाव ज्योती ठेवले आहे. अंधारात डगमगायचे नाही. त्यातून मला जिद्ध मिळाली. आता असे कोणी उरले नाही. आता एकदाची निघून जावे वाटते सुसाईट नोटमध्ये यांची सर्वांची नावे लिहून ठेवावीत. पण पुन्हा वाटते की अरे ती सुसाईट नोट कोर्टाने खोटी ठरविली तर? मग हिरा बनसोडे सारखे फिर्याद कोणाकडे द्यायची? कधी वाटते बंदुक घेऊन सुसाट पळावे यांच्या मागे. पण नंतर वाटते पोथ्यांत सांगितले आहे तसे यांना माफ करावे. माझ्यासारखी एक महिला अधिकारी विझली तर राज्यातील सर्व पुरूष अधिकारी आणि लोकप्रतिनिधी महिला अधिकाऱ्यांना घाबरून वागतील. किंवा इतर अधिकारी ज्योतीसारखे फार धाडसाने वागू नये म्हणतील. साईड पोस्ट मागतील किंवा नोकरीच सोडतील, असे हुंदके देत त्यांनी म्हटले आहे.

वाचाः

यानंतर त्यांनी लोकप्रतिनिधींवर आरोप केले आहेत. लसीकरण केंद्रावर एका आरोग्य कर्मचाऱ्याला लोकप्रतिनिधीने मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला आहे. ‘मी दुकानदारांचे लसीकरण करून घेतले म्हणून लोकप्रतिनिधींना राग आला. त्यांनी रात्रीच आरोग्य केंद्रात जाऊन महिला आरोग्य अधिकाऱ्याला खोदून खोदून विचारले. त्यांच्या एका लिपिकाला मारहाण केली. ती महिला अधिकारीही माझ्यासारखीच. तीही रडू लागली. तिच्यावर हात साफ करता आला नाही, म्हणून लोकप्रतिनिधींनी लिपिकाला बदडून काढले. मी त्या महिला अधिकाऱ्यांना वरिष्ठांना सांगण्याचा सल्ला दिला. पण वरिष्ठ महिला नव्हते. त्यामुळे त्यांनी महिलेची बाजू घेतली नाही. उलट काही वेळातच त्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ समोर आला की मला लोकप्रतिनिधींनी मारले नाही. त्यामुळे महिला अधिकाऱ्यांना कोणीही वाली नाही. त्यांनी ड्रॉवरमध्ये सुसाईट नोट ठेवूनच काम करायचे. या सगळ्यांची नावे मी मुद्दाम घेतली नाहीत. ते पुरुष असले तरी कोणाचे तरी पती, भाऊ, मुलगा आहेत. ते आत गेले तर माझ्या त्या महिला भगिनी उघड्यावर येतील. ज्यांनी त्रास दिला ते मनातून समजून जातील.’ असेही त्यांनी म्हटले आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here