गेल्या दोन दिवसांपासून टोमॅटोचा दर शून्यावर येऊन ठेपला आहे. मागील आठवड्यात एक कॅरेट टोमॅटोचे साडेतीनशे ते चारशे रुपये येत होते. मात्र याच एक कॅरेट टोमॅटोला आता फक्त ५ ते ६ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे गावांमधून अनेक किलोमीटर दूर असलेल्या बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी नेलेल्या टोमॅटोच्या विक्रीतून हातात एकही रुपया न पडता उलट ज्या वाहनातून टोमॅटोचे कॅरेट बाजार समितीत नेण्यात आले त्याचे भाडेसुद्धा शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातूनच देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
टोमॅटोचे भाव गडगडल्याने पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील अनिकेत खरात या तरुण शेतकऱ्याने आपला २ एकर शेतातील टोमॅटोचा प्लॉटच उखडून टाकला आहे. हा प्लॉट उखडताना हा व्यवस्थेविरोधात रोष व्यक्त करत आहे. मर-मर मरून उत्पादित केलेल्या शेतीमालाला जर कवडीमोल दराने किंवा शून्य रुपये दर मिळत असेल तर शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे .
दरम्यान, टोमॅटोचे उत्पादन घेण्यासाठी या तरुण शेतकऱ्याने दोन एकरात एक ते दीड लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र बाजारभाव पडल्यामुळे या तरुण शेतकऱ्याने संतापाच्या भरात अखेर आपला दोन एकराचा टोमॅटोचा प्लॉट उद्ध्वस्त करून टाकत राग व्यक्त केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times