मिठाईवाले किंवा सुट्या गोड खाद्यपदार्थांचे विक्रेते यांना यापुढे हे पदार्थ किती तारखेपर्यंत वापरावेत, हे सांगितल्याशिवाय विकता येणार नाहीत. या सुट्या किंवा पॅकबंद नसलेल्या गोड पदार्थांची विक्री करताना ते पदार्थ कधी तयार केले याची तारीख तसेच किती तारखेपर्यंत वापरावेत याचा ठळक उल्लेख करणे अन्नसुरक्षा प्राधिकरणाने (फसाय) बंधनकारक केले आहे. फसायने याविषयी आदेश काढला असून तो १ जूनपासून लागू होणार आहे.
याविषयीचा आदेश फसायने सोमवारी जारी केला. त्यानुसार, जनहित लक्षात घेऊन देशातील सर्व मिठाईवाले तसेच मिष्टान्न विकणारे अशा सर्वांना ही मिष्टान्ने कधी तयार केली व किती तारखेपर्यंत वापरता येतील, या दोन्ही तारखांचा उल्लेख त्या पदार्थांच्या दुकानात मांडल्या जाणाऱ्या ट्रेवर ठळकपणे नमूद करणे बंधनकारक राहणार आहे. बऱ्याचदा मुदत संपलेल्या मिठाया, , सुटी (ब्रॅण्ड नेसलेली) चॉकलेट्स विकली जातात आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळेच देशातील सर्व विक्रेत्यांनी हा आदेस पाळावा, असे आवाहन फसायने केले आहे.
फसायच्या या निर्णयावर फेडरेशन ऑफ स्वीट्स अॅण्ड नमकिन मॅन्युफॅक्चरर्स या मध्यवर्ती संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. या संघटनेचे ४०० हून अधिक दुकानदार सदस्य आहेत. यामध्ये हल्दिराम, बिकानेरवाला यांसारखे मोठे उत्पादकही आहेत. एका दुकानात सरासरी २०० उत्पादने विक्रीस मांडलेली असतात. या प्रत्येक उत्पादनाचे आयुष्य वेगवेगळे असतात. म्हणून प्रत्येक उत्पादनाच्या ट्रेवर ते कधी तयार केले व किती तारखेपर्यंत वापरता येईल हे लिहिणे शक्य नसल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे.
ब्रॅण्डेड मिठाया व नमकिन किंवा पॅकबंद मिष्टान्ने यांच्यावर पूर्वीपासूनच उत्पादनाची तारीख व मुदत छापलेली असते. सोनपापडी, रसगुल्ला, गुलाबजाम यांसारख्या पॅकबंद उत्पादनांवर हा उल्लेख असतो. त्यामुळे फसायच्या आदेशाचा फटका या कंपन्यांना बसणार नाही. मात्र देशात हजारो दुकाने आहेत, जेथे पारंपरिक पद्धतीने मिष्टान्ने तयार केली जातात. यापैकी बऱ्याच मिष्टान्नांत दुधापासून तयार केलेले पनीर, खवा, तूप यांसारखे घटक साखर, स्वयंपाकाचे तेल याबरोबर वापरले जातात. अशाच पदार्थांमध्ये भेसळ होण्याचीही भीती असते. हे टाळण्यासाठीच फसायने सुट्या किंवा बॅण्डेड नसलेल्या प्रत्येक मिष्टान्नावर ते कधी तयार केले हे व किती तारखेपर्यंत वापरण्यायोग्य असेल ते लिहिणे व तसे ग्राहकास सांगणे बंधनकारक केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times