‘मुळात ज्याचं काही आकलनच नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं? मी काय वाचतो आणि मी काय वाचलंय हे मला माहीत आहे, माझ्या पक्षाला आणि सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे मला मोजण्याचा प्रयत्न करू नये,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडवर निशाणा साधला आहे.
जेम्स लेन प्रकरणावर पुन्हा काय म्हणाले राज ठाकरे?
‘राजकीय फायद्यासाठी ठरवून जाती-जातीमध्ये भांडणं लावली जात आहेत. मी त्यादिवशी म्हणालो की आता कुठे आहे जेम्स लेन? नेमका तेव्हाच कसा तो आला आणि आग लावून निघून गेला? यामागे मोठं षडयंत्र आहे,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच राज यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचायला हवं, असा सल्ला देणाऱ्यांना उत्तर देताना ते म्हणाले की, ‘प्रबोधनकार तुम्हाला पण परवडणारे नाहीत, आणायचे असतील तर पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणा, मग तुम्हाला कळेल तुम्ही कुठे आहात.’
संभाजी ब्रिगेडने राज ठाकरेंवर काय टीका केली होती?
काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. राज यांच्या या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी खरपूस समाचार घेतला होता. ‘राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचंही आकलन नाही. राजकारणात कुठलंही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे,’ असा घणाघाती आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times