नवी दिल्लीः अस्थिर अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना ( ) मायदेशी आणण्यासाठी हवाई दलाचे C-17 विमान सज्ज आहे. काबुल विमानतळावर येण्यासाठी पुरेसे भारतीय नागरिक सक्षम होताच हवाई दलाचे (IAF) विमान काबुलला जाईल, असं सूत्रांनी सांगितलं. भारतीय हवाई दलाचे वाहतूक विमान काबुलला नेण्यासाठी भारत सरकार अमेरिकेच्या प्रशासनासोबत मिळून काम करत आहे. भारतीय हवाई दलाच्या या C-17 विमानाद्वारे २५० भारतीयांना अफगाणिस्तानातून बाहेर काढता येईल, अशी सरकारला आशा आहे. आता किती भारतीय विमानतळापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतील? यावर हे सर्व अवलंबून आहे. कारण अफगाणिस्तानची शहरं तालिबानच्या ताब्यात आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.

काबुलसाठी एअर इंडियाच्या विमानांची उड्डाणं करणं अवघड झालं आहे. यामुळे हवाई दलाला स्टँड बायवर ठेवण्यात आलं आहे. जवळपास ४०० हून अधिक भारतीयांना बाहेर काढण्याची गरज पडू शकते, असा अंदाज आहे. पण अजूनही अचूक आकडेवारी समोर आलेली नाही. तसंच गृहमंत्रालय अफगाण नागरिकांच्या व्हिसा अर्जांचाही विचार करत आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

भारतीय हवाई दलाच्या दोन C-17 या विमानांनी १५ ऑगस्टला भारतीय दुतावास कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी उड्डाण केले होते. भारतीय दुतावासाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आयटीबीपीच्या जवानांनाही आणण्यात येणार होतं. पण काबुल विमानतळावर गोंधळाच्या परिस्थितीमुळे एकाच विमानचं उड्डाण होऊ शकलं. पण नंतर भारतीय हवाई दलाच्या C-17 या दुसऱ्या विमानाद्वारे भारतीय दुतावासातील १२० कर्मचारी आणि राजदूत रुद्रेंद्र टंडन यांच्यासह आयटीबीपीच्या जवानांना मायदेशात आणण्यात आलं. हे विमान मंगळवारी सकाळी सुरक्षित अफगाण हवाई हद्दीतून बाहेर पडून गुजरातच्या जामनगर विमानतळावर उतरलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here