म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारकडून मला बळीचा बकरा केले जात आहे. विद्यमान मुख्य सचिव व तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे यांनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे संमती दिल्यानेच मी फोन टॅपिंग केले. मात्र आता ते सर्व दोष माझ्यावर टाकून स्वत:ला निर्दोष ठरवू पाहत आहेत. इतकेच नव्हे तर फोन टॅपिंगविषयी मी चुकीची कबुली दिल्याचे खोटे विधान त्यांनी अहवालात केले. मी माझे कर्तव्य बजावले असल्याने चुकीच्या कबुलीचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे मी लाय डिटेक्टर चाचणीस सामोरे जाण्यास तयार आहे. कुंटे यांनीही त्याला सामोरे जावे’, असा युक्तिवाद राज्य गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यातर्फे शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.

बेकायदा फोन टॅपिंग व संवेदनशील कागदपत्रे उघड केल्याच्या आरोपांखाली सायबर पोलिसांनी त्यांच्याविरोधात शासकीय गोपनीयता कायदा, माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच इंडियन टेलिग्राफ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. त्याला त्यांनी रिट याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. ‘पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नेमणुकांमधील भ्रष्टाचार व राजकीय हस्तक्षेप उघडकीस आणण्याच्या हेतूने फोन टॅपिंग करण्यात आले. तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोल जैस्वाल यांच्या परवानगीने आणि इंडियन टेलिग्राफ कायद्यांतर्गत प्राधिकृत अधिकारी म्हणून कुंटे यांनी संमती दिल्यानेच मी ते केले. कुंटे यांनीच ती संमती वेळोवेळी वाढवली. याविषयीचा अहवाल मी २५ ऑगस्ट २०२० रोजी महासंचालकांकडे दिला. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची खळखळ नव्हती. मात्र, त्यानंतर चित्र बदलले आणि माझी बिनमहत्त्वाच्या व पूर्वी स्वतंत्रपणे अस्तित्वात नसलेल्या नागरी संरक्षण दलप्रमुख पदावर बदली करण्यात आली. त्या पदासाठी काही पायाभूत सुविधाही नव्हत्या. मी केवळ कर्तव्य केले असताना मला अशी वागणूक देण्यात आली. अखेर जानेवारी-२०२१मध्ये मी केंद्रीय राखीव पोलिस दलात हैदराबादमध्ये प्रतिनियुक्तीवर गेले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीवर २३ मार्च रोजी माझा अहवाल झळकावला. वास्तविक त्याच्याशी माझा काही संबंध नाही. तरीही २६ मार्च रोजी माझ्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. अहवाल उघड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवल्यानंतर कुंटे यांनी कारण नसताना माझ्यावर ठपका ठेवत माझी बदनामी केली’, असा युक्तिवाद शुक्ला यांच्यातर्फे खंडपीठासमोर करण्यात आला. या प्रकरणी आज, शनिवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here