‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हेक्टरी आणि गुंठेवारीतील फरक कळत नाही. त्यांना केवळ मुंबईतील जमिनीच्या किमती कळतात. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेते यांच्याकडून हेक्टरी आणि गुंठेवारीतील फरक समजून घ्यावा’, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी मंगळवारी ठाकरे यांना लगावला.
भाजपने मंगळवारी शेतकरी आणि महिला अत्याचाराच्या प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलन केले. मुंबईत आझाद मैदानावर आयोजित आंदोलनात पाटील यांनी मुख्यमंत्री आणि सरकारला लक्ष्य केले. ‘आघाडीचे सरकार जनतेला फसवून सत्तेत आले आहे. जनादेश नसताना सत्तेसाठी आकड्यांची जुळवाजुळव करून आणि अभद्र आघाडी करून सरकार स्थापन केले. कर्जमाफीच्या नावाखाली या सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही’, असे पाटील म्हणाले. ‘अतिवृष्टीग्रस्त आणि अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देऊ, असा शब्द ठाकरे यांनी दिला होता. पण, सत्तेत आल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडला. राज्यात आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रपती राजवटीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांचे काळजीवाहू सरकार अस्तित्वात होते. त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत दिली. पण आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मदतीच्या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले’, असा आरोपही पाटील यांनी लगावला.
‘सरकारचा रिमोट शरद पवारांकडे’
‘राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे शरद पवार यांच्या रिमोट कंट्रोलने चालत आहे. पवारांचा प्रत्येक शब्द मुख्यमंत्र्यांना लगेच कळतो. मुख्यमंत्री हे पवारांना हवे तसेच काम करतात. त्यांना राज्यातील जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही’, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times