सांगली : कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्या मतदार संघातील काँग्रेसच्या विश्वासू नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लांड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षाला झटका दिल्याची चर्चा सांगलीत सुरू आहे.

दरम्यान, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मंत्री विश्वजित कदम यांनी अरुण लाड यांना मदत केली होती. त्यानंतर काही महिन्यातच अरुण लाड यांच्याकडून काँग्रेसमधील नेत्यांची पळवापळवी सुरू झाल्याने आता विश्वजीत कदमांकडून काय प्रतिक्रिया येते, याची सर्वांना उत्सुकता आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून एकमेकांच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरूच आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष नीता देसाई, माजी उपसरपंच माधवराव देशमुख यांच्यासह डझनभर नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. कडेगाव- वांगी मतदारसंघात स्वर्गीय पतंगराव कदम यांचे गेल्या अनेक वर्षांपासून एकहाती वर्चस्व होते. त्यांच्या निधनानंतर विश्वजीत कदम यांच्याकडे मतदारसंघाची सूत्रे आली. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आघाडी धर्माचे पालन करीत राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांना मदत केली होती.

या मदतीची जाणीव ठेवून आमदार अरुण लाड पुढील निवडणुकांमध्ये मंत्री विश्वजित कदम यांना त्रासदायक ठरेल अशी भूमिका घेणार नाहीत, अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र काही महिन्यातच राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. कडेगावच्या माजी नगराध्यक्षा नीता देसाई या गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षातील विश्वासू नेत्या होत्या. त्यांनी अन्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने कडेगावात काँग्रेसला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष विस्तारानंतर आता कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार, हे आता पाहवे लागणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here