सीएए, एनआरसीच्या मुद्द्यावरून दिल्लीत हिंसाचार उफाळला आहे. नव्या कायद्याचे विरोधक व समर्थक आमनेसामने आले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर व विशेषत: दिल्लीत असतानाच हे सगळं घडत आहे. त्याबद्दल शिवसेनेनं चिंता व्यक्त केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून अप्रत्यक्षरित्या भाजपला सुनावण्यात आलं आहे. दिल्लीतील सध्याच्या दंगलीस जबाबदार कोण? हे स्पष्ट होणे गरजेचे आहे,’ अशी मागणी करण्यात आली आहे.
अग्रलेखातील ठळक मुद्दे:
>> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे दिल्लीतील स्वागत दंगलीच्या आगडोंबाने, रस्त्यावरील रक्ताच्या सड्यांनी, आक्रोश, किंकाळ्या, अश्रुधुरांच्या नळकाड्यांनी, दिल्लीतील या भयपटाने व्हावे हे बरे नाही. ट्रम्पसाहेब हे प्रेमाचा संदेश घेऊन दिल्लीत आले, पण त्यांच्या समोर हे काय घडले? अहमदाबादमध्ये ‘नमस्ते’ आणि दिल्लीत आगडोंब!
>> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हिंदुस्थान दौरा सुरू असतानाच दिल्लीत दंगलीचा आगडोंब उसळला आहे. पंतप्रधान मोदी व ट्रम्पसाहेब यांच्यात चर्चा सुरू असताना शहर जळत होते. दंगलीमागची कारणे काहीही असोत, पण देशाच्या राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था राखायला केंद्र सरकार अपयशी ठरले आहे.
>> १९८४ सालचा शीखविरोधी दंगलीचा ठपका आजही काँग्रेसवर ठेवला जातो. आजचं दिल्लीतलं वातावरण १९८४ च्या दंगलीचीच भयाण वास्तवता दाखवणारे आहे.
>> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व आपले पंतप्रधान मोदी यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत असताना त्यांच्या डोळ्यांसमोर हा असा रक्तपात व्हावा हे दृष्य काही चांगले नाही. दिल्ली विधानसभा निवडणूक आटोपल्यावर हिंसाचार उसळला आहे हे रहस्यमय आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला व आता दिल्लीची ही अशी दशा झाली आहे.
>> भाजपच्या काही नेत्यांनी इशारे, धमक्यांची भाषा केली व तिथेच ठिणगी पडली असे सांगितले जाते. म्हणजे शांतपणे चाललेले हे आंदोलन भडकावे व त्याचे पर्यावसान आज भडकलेल्या दंगलीत व्हावे अशी कुणाची इच्छा होती काय? निदान ट्रम्प महाराज परत जाईपर्यंत तरी संयम राखायला हवा होता.
>> ट्रम्प यांनी मोदी यांचे कौतुक केले, किमान पंचवीसवेळा मोदी आणि ट्रम्प यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या, दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जे विविध करार-मदार झाले त्यात तीन अब्ज डॉलर्स किमतीची संहारक क्षेपणास्त्रे आमच्या गळ्यात मारली.
>> ट्रम्प यांच्या पायगुणाने देशात, महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक वाढणार असेल तर क्षेपणास्त्र व्यवहाराकडे एक व्यापारी करार म्हणून पाहायला हवे. प्रश्न पाकिस्तानविरोधात लढण्यासाठी क्षेपणास्त्रे मिळाली हा नसून मोठा फौजफाटा हाती असूनही दिल्लीची दंगल आटोक्यात येत नाही हा आहे.
वाचा:
> ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान असा हिंसाचार घडावा आणि त्यातून देशाची प्रतिमा मलीन व्हावी यासाठी दंगलीचे कारस्थान रचले आहे असे गृहमंत्रालय म्हणत आहे, पण असे कारस्थान रचले व रटारटा शिजले हे गृहमंत्रालयास समजू नये हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे.
>> ज्या हिमतीने कश्मीरात ३७०, ‘३५ अ’ सारखी कलमे हटवली, त्याच हिमतीने दिल्लीतील दंगलीवरही नियंत्रण मिळवायला हरकत नव्हती.
>> दिल्लीत लष्कराला पाचारण केल्याचे वृत्त केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. पण लष्करानं ते वृत्त फेटाळलं आहे. मग दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण? याआधी ‘बुरखा’ घालून भाजपची एक कार्यकर्ती शाहीनबाग आंदोलकांच्या गर्दीत घुसली होती. त्यामुळे नक्की कोण कोणाच्या पोशाखात व मुखवट्यात फिरत आहेत ते समजायला मार्ग नाही.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times