मुंबई : बड्या उद्योजकांना आकर्षित करण्यात पुन्हा एकदा गुजरातने बाजी मारली आहे. जागतिक स्तरावर सर्वात मोठा पोलाद उत्पादक समूह असलेल्या आर्सेलर मित्तलने गुजरातमध्ये प्रचंड गुंतवणुकीची घोषणा केली आहे. आर्सेलर मित्तल सुरतजवळील हाजीरा येथे पोलाद उत्पादन प्रकल्पात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये आर्सेलर मित्तलकडून तब्बल एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

आर्सेलर मित्तल समूहाचे अध्यक्ष आणि अब्जाधीश उद्योजक असलेल्या लक्ष्मी निवास मित्तल आणि आर्सेलर मित्तल निप्पाॅन स्टील इंडियाचे सीईओ दिलीप ओमेन यांनी शुक्रवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांची भेट घेतली. त्यानंतर आर्सेलर मित्तलकडून गुजरातमध्ये विविध क्षेत्रात होणाऱ्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली.

हाजिरा येथील पोलाद प्रकल्पाच्या विस्तारासाठी आर्सेलर मित्तलकडून ५०००० कोटींची गुंतवणूक केली जाईल, असे लक्ष्मी निवास मित्तल यांनी या बैठकीनंतर सांगितले. आर्सेलर मित्तल आणि निप्पाॅन स्टीलने २०१९ मध्ये एस्सार कंपनीकडून हा प्रकल्प ताब्यात घेतला होता. एस्सार कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने या प्रकल्पाची विक्री करण्यात आली.

याशिवाय मित्तल समूहाकडून गुजरातमध्ये आणखी ५०००० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा आणि हायड्रोजन गॅस या क्षेत्रात मित्तल समूह ५०००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. या घोषणेनंतर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मित्तल यांना दिले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here