सांगली : सांगली आणि कोल्हापुरात महापुराने होणारे नुकसान टाळण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्यासह पंचगंगेचे पाणी बोगद्याद्वारे राजापूर बंधा-यापुढे सोडण्याची कल्पना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मांडली आहे. या उपाययोजनांमुळे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पृथ्वीराज पाटील फाउंडेशनतर्फे सांगलीत आयोजित केलेल्या पूर परिषदेत ते बोलत होते.

गेल्या १७ वर्षांत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याने तीन महापूर अनुभवले. याशिवाय दरवर्षी येणाऱ्या पुराने नदीकाठावरील शेतीसह घरांचे मोठे नुकसान होते. कोट्यवधी रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी महापूर नियंत्रणाचे विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. महापूर टाळण्यासाठी काय करता येईल, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनमार्फत शनिवारी सांगलीत पूर परिषदेचे आयोजन केले होते.

या परिषदेत बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून महापुरामुळे होणारे नुकसान वाढत आहे. हवामान बदल, प्रदूषण, अतिक्रमणे यामुळे पुराचा धोका वाढला आहे. नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची वेळ आली आहे. सांगली शहरात पूर येणाऱ्या ठिकाणी पूरसंरक्षक भिंती बांधण्याच्या पर्यायावर विचार सुरू आहे. बाजारपेठा आणि घरांचे स्थलांतर करणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य होणार नाही. यामुळे पूरसंरक्षक भिंत बांधण्याचा पर्याय पुढे आला आहे. याशिवाय कृष्णा खोऱ्यातील पाणी भीमा खोऱ्यात वळवण्याबाबतही विचारविनिमय सुरू आहे. यातून सांगलीत होणारी हानी टाळता येईल.’

‘कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. या तुलनेत धरणांची पाणी साठवण क्षमता कमी आहे. महामार्गाच्या भरावामुळे पंचगंगेचे पाणी शहरात तुंबते. यावर उपाय म्हणून पंचगंगेचे पाणी बोगद्याद्वारे कृष्णा नदीत राजापूर बंधा-यापुढे सोडता येईल. यामुळे कोल्हापूर शहरासह शिरोळ तालुक्यातील नुकसान टाळता येईल.’

दोन्ही उपायांच्या अंमलबजावणीनंतर पूर नियंत्रित ठेवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर परिषदेसाठी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील, जलतज्ञ राजेश पवार, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here