किरीट सोमय्या यांनी बंगल्याच्या तोडकामाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ‘करून दाखविले, पुढचा नंबर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा’, असंही सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘उद्या मी स्वत: दापोलीला जाऊन तोडकामाची पाहणी करणार आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचे बांधकाम सीआरझेड ३ मध्ये येत होते. या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नार्वेकर यांनी घेतलेली नव्हती, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. तशी तक्रारच त्यांनी संबंधित ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, जिल्हाधिकारी, जिल्हा सागरी किनारा व्यवस्थापन समिती, महाराष्ट्र सागरी किनारा झोन व्यवस्थापन प्राधिकरण व पर्यावरण खात्याकडं केली होती. मात्र, कारवाई झाली नव्हती. ‘मुख्यमंत्री कार्यालयाचा जबरदस्त दबाव असल्यामुळं रत्नागिरी जिल्हा प्रशासन या अनैतिक काम करणाऱ्या राजकीय नेत्यांची पाठराखण करत आहे,’ असा आरोपही सोमय्या यांनी केला होता. लोकायुक्त व राष्ट्रीय हरित लवादाकडं देखील या प्रकरणी सुनावणी सुरू होती.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर बेकायदा रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यावर देखील कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times