: नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी अचानक गंगा जमना हा रेड लाइट एरिया सील करून तिथं जमावबंदी लागू केली. तसंच तिथल्या वारांगनांना तिथून निघून जाण्यास सांगितलं. पोलिसांच्या या कारवाईला आता विरोध सुरू असून, दुसरीकडे या कारवाईचं समर्थनही करण्यात येत आहे. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास समर्थक व विरोधक समोरासमोर ठाकल्याने गंगा जमनातील मासूरकर चौकात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं.

समर्थक व विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याने वातावरण चिघळलं. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा ताफा दाखल झाला. पोलीस दोन्ही गटाला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दहा दिवसांपूर्वी पोलिसांनी गंगा जमनाला सील ठोकून या ठिकाणी जमावबंदी लागू केली. या कारवाईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी विरोध केला. पोलिसांची ही कारवाई हिटलरशाही असल्याचा आरोप करत रक्षा बंधनापर्यंत या भागातील जमावबंदी न हटवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. ज्वाला धोटे या समर्थकांसह गंगा जमनात पोहोचल्या. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व नगरसेविका आभा पांडे यांच्यासह परिसरातील नागरिकही गंगा जमनाविरोधात व पोलीस कारवाईच्या समर्थनार्थ मासूरकर चौकात आले.

पोलीस कारवाईचे विरोधक व समर्थक समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी दोन्ही गटाला वेगळे केले.

विरोधक व समर्थक दोन्ही राष्ट्रवादीचेच!
ज्वाला धोटे व नगरसेविका आभा पांडे या दोघीही राष्ट्रवादीच्याच नेत्या आहेत. एकाच पक्षात असूनही एक विरोधक व एक समर्थक असे दोन गट रविवारी पाहायला मिळाले. दोन नेत्या समोरासमोर ठाकल्याने राष्ट्रवादीतील नेत्यांमधील ‘अंतर’ पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा परिसरात होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here